घरमहाराष्ट्रNavneet Rana : सुप्रीम कोर्टाने जातप्रमाणपत्र ठरवले वैध, नवनीत राणांची उमेदवारी अबाधित

Navneet Rana : सुप्रीम कोर्टाने जातप्रमाणपत्र ठरवले वैध, नवनीत राणांची उमेदवारी अबाधित

Subscribe

नवी दिल्ली : अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बहाल करून सर्वोच्च न्यायालयाने आज, गुरुवारी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना दिलासा दिला. 2021मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविले होते. सर्वोच्च न्यायालायने उच्च न्यायालयाचा हा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे आता भाजपाच्या उमेदवार म्हणून अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

यासंबंधी सादर करण्यात आलेली सर्व कागदपत्रे आणि तथ्ये पाहता नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाने चौकशी समितीच्या अहवालात हस्तक्षेप करायला नको होता, अशी टिप्पणी न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने केली आहे. भाजप नेते राणा यांचे जात प्रमाणपत्र पुनर्संचयित करताना खंडपीठाने म्हटले की, या प्रकरणात चौकशी समितीने कागदपत्रांचा सारासार विचार करून नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचे पालन करून निर्णय दिला होता, असेही सांगत न्यायालयाने नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र अबाधित ठेवले.

- Advertisement -

भाजपामध्ये नुकताच प्रवेश करणाऱ्या नवनीत राणा यांनी 2019मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली होती. अनुसूचित जातीची सदस्य असल्याने नवनीत राणा यांनी या राखीव जागेवरून निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता.

- Advertisement -

तथापि, मुंबई उच्च न्यायालयाने 8 जून 2021 रोजी जातप्रमाणपत्र अवैध ठरविल्यानंतर त्यांनी त्याला सर्वोच्च न्यायालयाला आव्हान दिले होते. त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याबरोबरच उच्च न्यायालयाने त्यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता. मुंबईच्या उपायुक्तांनी 30 ऑगस्ट 2013 रोजी दिलेले जात प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी आनंदराव अडसूळ यांनी याचिकेत केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 28 फेब्रुवारी रोजी नवनीत राणा यांच्या अपीलावरील निर्णय राखून ठेवला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -