Navratri 2021: मुंबई वगळता राज्यभरात गरबा खेळण्यास परवानगी; टोपेंनी सांगितल्या अटी-शर्थी

Navratri 2021 garba playing allowed in state said rajesh tope
Navratri 2021: मुंबई वगळता राज्यभरात गरबा खेळण्यास परवानगी; टोपेंनी सांगितल्या अटी-शर्थी

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यामुळे महापालिकेने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून सावध राहण्यासाठी यंदाच्या नवरात्रोत्सवावर काही निर्बंध घातले आहेत. मुंबई महापालिकेने गरबा खेळण्यास आणि देवीचे आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान मुंबईत वगळता राज्यभरात गरबा खेळण्याची परवानगी सांस्कृतिक विभागाने दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यभरात गरबा खेळताना नियम आणि अटी पाळण्याचे आवाहन टोपे यांनी केले.

जालनामध्ये पत्रकारांशी बोलत असताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, ‘सांस्कृतिक कार्य मंत्रालय यांच्या वतीने गरबा उत्सव साजरा करण्यासंदर्भात मान्यता दिली आहे. तीन पद्धतीने गरबा साजरा केला जातो. खुल्या मैदानात, ऑडिडोरियम आणि बंद हॉलमध्ये गरबा खेळला जातो. तर या सर्व पार्श्वभूमीवर खुल्या मैदानात गरबा खेळतात सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क आवश्यक असणार आहे. ऑडिडोरियम आणि हॉल्समध्ये त्याच्या क्षमतेच्या ५० टक्के लोकं आले पाहिजेत. याबाबतची दक्षता संबंधित हॉल्स आणि ऑडिडोरियम मालकाने बाळगण्याची गरज आहे. यासंदर्भात माझे सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्रालयातील सचिव सौरभ विजय यांच्याशी बातचित झाली आहे.’

गेल्यावर्षी नवरात्रोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. गरबा खेळण्यास पूर्णपणे मनाई केली होती. मात्र यंदा कोरोना नियमांचे पाळन करून गरबा खेळण्यास परवानगी देण्यात आली आहे.


हेही वाचा – Navratri 2021: नवरात्रोत्सवावर यंदाही विरजण, गरबा खेळण्यास मनाई; वाचा नियमावली