शिवसेना हाच आमचा डीएनए – महापौर किशोरी पेडणेकर

Mayor kishori pednekar
महापौर किशोरी पेडणेकर

शिवसेना हाच आमचा डीएनए आहे. कौटुंबिक पातळीवर चालणारा हा जगातील बहुधा एकमेव पक्ष असावा. त्यामुळे ‘मातोश्री’चा आदेश हाच आमच्यासाठी शेवटचा शब्द आहे. याच आदेशानुसार आम्ही अहोरात्र मुंबईचा विकास करतोय. मुंबईकर म्हणूनच आमच्यावर विश्वास ठेवताहेत, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

दै. आपलं महानगर आयोजित कोकण मर्कंटाईल बँक प्रस्तुत कलामंदिर नवदुर्गोत्सवातील पहिली दुर्गा म्हणून सहभागी होण्याचा मान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना मिळाला. कोविड काळात दोन वेळा कोरोनाची लागण होऊनही किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांच्या आरोग्य व्यवस्थेवर नेटाने काम केले. स्वतः परिचारिका म्हणून रुग्णसेवा केलेल्या किशोरी पेडणेकर पक्ष कार्यकर्ती म्हणून स्वत:चा एक ठसा उमटवला आहे. विरोधकांच्या टीकेचा शिवसेनेच्या शैलीत समाचार घेणार्‍या पेडणेकर आपली यशोगाथा मांडताना सांगतात, शिवसेना हाच आमचा डीएनए आणि पक्षप्रमुखांचा आदेश हेच आमचे ब्रह्मवाक्य.

३२ वर्षे मुंबईत सेनेचा भगवा फडकतोय. कारण मुंबईकरांचा शिवसेनेवरचा विश्वास. येणार्‍या निवडणुकीत पुन्हा एकदा मतदार आम्हाला कौल देतील. कारण या शहराला चांगले रस्ते, स्वच्छ पाणी, चांगलं शिक्षण देण्याचा आमचा हेतू स्वच्छ आहे. विरोधक जे काही बोलतायत ते सगळं राजकीयच आहे. मुख्यमंत्री म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं विकासाकडे बारीक लक्ष आहे. त्यामुळे पाच वर्षांनंतरची मुंबई अधिक अभिमानास्पद असेल, असा विश्वासही पेडणेकर व्यक्त करतात.

हाडाची कार्यकर्ता ते मुंबईचे महापौर असा पल्लेदार प्रवास केलेल्या किशोरी पेडणेकर सांगतात, गेल्या काही वर्षांत राजकारणाचा आणि कार्यकर्त्यांचाही पोत बदललेला आहे. जेव्हा नेते मोठे होतात तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांकडेही तितक्याच काळजीपूर्वक आणि जाणीवेने लक्ष देण्याची गरज आहे. नेत्यांनी सगळ्या सोयीसुविधा आणि ऐश्वर्य उपभोगायचे आणि कार्यकर्त्यांनी मात्र निरपेक्षपणे काम करायचे हे फार काळ कार्यकर्ते सहन करणार नाहीत याची जाणीव प्रत्येकाने ठेवण्याची गरज आहे आणि त्यामुळेच मी मुंबईची महापौर असली तरी शाखाप्रमुख किंवा गटप्रमुख या सगळ्यांना समजून घेऊन राजकीय प्रवास करणे गरजेचे आहे, असे मला वाटते आणि मी तसे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. कारण विभागातले कार्यक्रम कार्यकर्त्यांची शिबिर अगदी वर्षा सहलीला किंवा कुटुंब मेळावा या सगळ्या गोष्टींकडे मोठा झाल्याने त्यांनी मागे वळून बघताना एक वेगळी जाणीव जपण्याची गरज आहे आणि ते जर झाले नाही तर पक्षातली कौटुंबिकता धोक्यात येईल याची सगळ्यांनीच जाण ठेवणे गरजेचे असल्याचेही किशोरी पेडणेकर नमूद करतात.

ही मुलाखत सविस्तरपणे पाहण्यासाठी आपण www.mymahanagar.com ला भेट द्या.