महात्मा गांधी, स्वातंत्र्यसैनिकांच्या विरोधात टीका करण्याचे सुनियोजित षडयंत्र, मलिकांचा आरोप

nawab malik allegations statement on gandhi and freedom fighters is planned
महात्मा गांधी, स्वातंत्र्यसैनिकांच्या विरोधात टीका करण्याचे सुनियोजित षडयंत्र, मलिकांचा आरोप

अभिनेत्री कंगना रणौतने स्वातंत्र्य भीकमध्ये मिळाले असल्याच्या वक्तव्यानंतर आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. दुसरा गाल पुढे केल्यावर भीक मिळते स्वातंत्र्य नाही असे कंगनाने म्हटलं आहे. यावर राजकीय वर्तुळात वातवारण तापलं आहे. महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यसैनिकांविरोधात टीका करुन वातावरण निर्माण करण्याचा हा सुनियोजित प्रयत्न असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नवाब मलिक म्हणाले की, अशी एक महिला दिवसभर मलाना क्रीम घेऊन बसते व बोलते, तिच्या बोलण्याने महात्मा गांधी यांचे विचार संपणार नाही. जे प्रचारक आहेत जे अशा लोकांना पुढे करत आहेत त्यांना कळलं पाहिजे की, बापूंचे विचार जगाने स्वीकारले आहेत त्यामुळे कुणी कितीही प्रयत्न केले तरी यामध्ये यश मिळणार नाही. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ठणकावून सांगितले आहे.

महात्मा गांधी यांच्यावर टीका करणार्‍या कंगना रणौत हिला मोजक्या शब्दात नवाब मलिक यांनी फटकारले आहे. नियोजन पध्दतीने महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचे काम आधीपासूनच सुरू आहे. खोटा इतिहास सांगणे, खोटी माहिती उपलब्ध करून देणे अशा पध्दतीने वारंवार असे लोकं बोलत आहेत असेही नवाब मलिक म्हणाले.

कंगना रणौत हिने महात्मा गांधींजींचा अपमान करण्याचे काम केले केले आहे. अहिंसा हे विचार जगाने स्वीकारले आहेत. हिंसेने कुठलेही विषय सुटत नाही. त्यामुळे ठरवलं तर अहिंसेच्या मार्गाने काहीही प्राप्त करु शकतो मात्र तिने बापूंचा अपमान का केला आणि तिचा बोलविता धनी कोण आहे हे देशाला माहीत आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

ज्या लोकांनी बापूंची हत्या केली ते पण बापूंना बगल देऊ शकत नाही. बापूंचे विचार देशात, जगात लोकांनी स्वीकारले आहेत. एखादी महिला बापूंच्या विरोधात बोलल्यावर लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होतील हा कुणाचा समज असेल तर ती चूक आहे असे स्पष्टपणे नवाब मलिक यांनी सांगितले.


हेही वाचा :  ठाकरे कुटुंबीयांमधील “ही व्यक्ती” शक्तीस्थळावर राहणार हजर, अनिल देसाईंनी केलं स्पष्ट