Cruise Drug Bust: NCB ने भाजप नेत्याच्या मेव्हण्याला सोडलं, ‘त्या’ व्यक्तीचा उद्या पर्दाफाश करणार- नवाब मलिक

nawab malik

मुंबईत क्रूझवर छापे टाकून मोठ्या ड्रग पार्टीचा पर्दाफाश (Cruise Drug Bust) केल्याची कारवाई संशयास्पद असा आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा स्फोटक आरोप एनसीबीवर (NCB) केले आहेत. एनसीबीने क्रूझवरुन दहाजणांना ताब्यात घेतलं. त्यातील दोन जणांना सोडण्यात आलं. यामध्ये भाजप नेत्याचा मेहुणा होता, असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला आहे. यासंदर्भात उद्या शनिवारी १२ वाजता पत्रकार परिषद घेत व्हिडिओ पुरावे सादर करणार आहे, अशी माहिती देखील मलिक यांनी दिली.

नवाब मलिक आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. “मुंबईमध्ये एनसीबीने क्रुझवर कारवाई केल्यानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. आम्ही ८ ते १० जणांना ताब्यात घेतलं आहे. मी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत असताना प्रश्न उपस्थित केला होता; ज्या अधिकाऱ्याच्या निरीक्षणाखाली कारवाई होते तो अधिकारी वेगवेगळी वक्तव्य कसं करु शकतो? एक तर ८ लोकं असतील किंवा १० लोकं असतील. दहा लोक असतील तर त्यात २ दोन जणांना सोडण्यात आलं असं मी मागच्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. यासंदर्भात मी उद्या पत्रकार परिषद घेणार आहे, ज्या दोन जणांना सोडण्यात आलं त्यासंदर्भात व्हिडिओसह पुरावे सादर करणार आहे,” असं मलिक म्हणाले.

नवाब मलिक यांनी पुढे बोलताना त्या दोन जणांमध्ये भाजपच्या एका नेत्याचा मेहुणा त्यामध्ये असल्याचा दावा केला आहे. भाजपच्या कुठल्या नेत्याच्या सांगण्यावरुन त्याला सोडण्यात आलं? समीर वानखेडे कुणाकुणाशी बोलत होते. हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत. वानखेडे यांनी त्यादिवशी ८ ते १० जणांना ताब्यात घेतल्याचं सांगतिलं होतं. याचा अर्थ आहे दोन लोकांना सोडण्याच्या तयारीत ते होते आणि ते बोलून गेले. ते दोन लोकं जी आहेत त्यांना एनसीबीच्या कार्यालयात दोन बॅगांसह आत कार्यालयामध्ये घेऊन गेले. काही तासांनी दोन लोक तेथे आले आणि सोबत त्यांना घेऊन गेले. ते सगळे व्हिडिओ पुरावे उद्या मी १२ वाजता सादर करणार. दोन पैकी एक भाजप नेत्याचा मेहुणा आहे, असं नवाब मलिक म्हणाले. त्यामुळे नवाब मलिक यांच्या उद्याच्या पत्रकार परिषदेवर सर्वांचं लक्ष लागून आहे.


हेहा वाचा – एनसीबीच्या कारवाईत भाजप कार्यकर्त्यांचा समावेश : नवाब मलिक