घरAssembly Session LiveNawab Malik : दादा गटावर भाजपाचे नियंत्रण! फडणवीसांच्या पत्रावर 24 तासांनंतरही राष्ट्रवादीची...

Nawab Malik : दादा गटावर भाजपाचे नियंत्रण! फडणवीसांच्या पत्रावर 24 तासांनंतरही राष्ट्रवादीची ठोस भूमिका नाही

Subscribe

नागपूर : आर्थिक गैरव्यवहार आणि देशद्रोह्यांशी संबंध ठेवल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे समर्थक आमदार नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करून घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून विरोध केल्यानंतर अजित पवार गटाला आज (8 डिसेंबर) दिवसभरात नवाब मलिक प्रश्नी फडणवीस यांना पटवून देणारी ठोस भूमिका मांडता आली नाही. त्यामुळे ऐन विधिमंडळ अधिवेशनात अजित पवार गटाची कोंडी झाली  असून आता राष्ट्रवादीच्या गटावर भाजपाचे अप्रत्यक्ष नियंत्रण असल्याचा संदेश यानिमित्ताने गेला आहे. (Nawab Malik BJP control over Dada group Even after 24 hours NCP has not taken a concrete stand on Devendra Fadnavis letter)

हेही वाचा – Pimpri Chinchwad Fire : अजित पवारांकडून आर्थिक मदत तर, सुप्रिया सुळेंकडून सखोल चौकशीची मागणी

- Advertisement -

22 महिन्यांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर विधानसभेत पाऊल ठेवलेले नवाब मलिक यांनी गुरुवारी सत्ताधारी बाकावर बसून आपण अजित पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट संकेत दिले. यावरून विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी  भाजपावर जोरदार हल्ला चढवला होता. या हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना अनपेक्षितपणे पत्र लिहीले. या पत्रात त्यांनी, सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. मलिक यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र, अशा प्रकारचे आरोप असताना मलिक यांना महायुतीचा भाग करणे योग्य होणार नाही, अशा शब्दात फडणवीस यांनी अजित पवार गटाचे कान टोचले.

फडणवीस यांच्या या पत्रानंतर नवाब मलिक यांच्यासंदर्भात नेमकी काय भूमिका घ्यावी, याबत अजित पवार गटात आज संभ्रम होता. त्यामुळे नवाब मलिकप्रश्नी भाजपाने घेतलेल्या भूमिकेला राष्ट्रवादीकडून स्पष्ट उत्तर देण्यात आले नाही. यासंदर्भात आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेले पत्र आपल्याला मिळाले आणि ते आपण वाचले आहे. आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने 2 जुलैला महायुतीसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो. त्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्यानंतर काल पहिल्यांदा ते सभागृहात आले. यासंदर्भात नवाब मलिक यांनी स्वत:ची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आम्ही पक्षाची भूमिका मांडू. त्यामुळे त्यांचे मत आम्हाला स्पष्टपणे कळू द्या, असे त्यांनी सांगितले. अजित पवार यांच्या या गुळमुळीत उत्तरामुळे त्यांचा गट आज बॅकफुटवर दिसला.

- Advertisement -

हेही वाचा – NCP Crisis : आयोगासमोरील सुनावणी पूर्ण; राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्हावर निर्णय कधी येणार?

पत्रामुळे राष्ट्रवादीची नाराजी

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या बाबतीत अजित पवार यांच्याशी चर्चा न करता थेट पत्र दिले. याशिवाय हे पत्र समाज माध्यमात जारी केले. त्यामुळे अजित पवार गटात नाराजी आहे. नवाब मलिक यांच्याबाबत अजित पवार किंवा अन्य नेत्यांशी बोलून वाद टाळता आला असता. शिवाय नवाब मलिक सभागृहात आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी कुठे जागा द्यायची, याबाबत चर्चा करून निर्णय घ्यायला हवा होता. मलिक यांना अपक्षांच्या शेवटच्या रांगेत जागा दिली असती तर हा प्रश्न उपस्थित झाला नसता, असे मत अजित पवार गटाच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने  व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -