Sameer wankhede: पहिल्या बायकोच्या कुटूंबाला ड्रग्ज केसमध्ये अडकवण्याची वानखेडेंनी दिली होती धमकी, मलिकांचा आरोप

nawab malik claim sameer wankhede threaten his first wife for not reveal truth
Sameer wankhede: पहिल्या बायकोच्या कुटूंबाला ड्रग्ज केसमध्ये अडकवण्याची वानखेडेंनी दिली होती धमकी, मलिकांचा आरोप

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात एक नवीन दावा केला आहे. वानखेडेंनी आपल्या पहिल्या बायकोला सत्य समोर येऊ नये यासाठी धमकी दिली आहे. तिच्या भावालाही बनावट ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात टाकण्यात आले आहे. समीर वानखेडे हे जन्मापासून मुस्लिम असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच नवाब मलिकांच्या नव्या आरोपांमुळे समीर वानखेडेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

नवाब मलिक म्हणाले की, गंभीर विषय आहे. समीर वानखेडे यांनी पहिल्या बायकोसोबत घटस्फोट घेतला आहे. भांडणे, वाद झाल्यानंतर ती मुलगी समोर येईल आणि सर्व सत्य सांगेल. या भीतीपोटी एका ड्रग्ज पेडलरच्या माध्यमातून त्यांच्या एका भावाकडे ड्रग्ज ठेवण्यात आले. यानंतर राज्य सरकारच्या एजन्सीच्या माध्यमातून त्याला अटक करण्यात आले. आजही तो मुलगा तुरुंगात आहे. मुलाला खोट्या केसमध्ये अडकवल्यानंतर वानखेडे पहिल्या बायकोच्या कुटुंबाला धमकी देत होते की, जर माझ्याविरोधात बोललात तर संपूर्ण कुटुंबालाच खोट्या ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात टाकेल अशी धमकी वानखेडे यांनी दिली. या कुटुंबावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न समीर वानखेडे यांनी केला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

समीर दाऊद वानखेडे यांची बोगसगिरी हळूहळू समोर येऊ लागली आहे. ज्या प्रकारे शेजारी राहणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याशी यांचा वाद झाल्यानंतर त्यांच्या मुलाला कुठेतरी २७ ए मध्ये फसवण्याचे काम केले आहे. त्या मुलाच्या कुटुंबाने एनडीपीएस कोर्टात बेल अॅप्लिकेशनमध्ये अशी मागणी केली आहे की, त्या इमारतीमधील सीसीटीव्ही तपासून पाहा त्यांच्या घरी कोणतीही छापेमारी करण्यात आली नाही. मुलाला बाहेर बोलवण्यात आले आणि त्याला बोगस ड्रग्ज केसमध्ये फसवण्यात आले आहे.

समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिमच

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे जन्मापासून मुस्लिम असल्याचे त्यांच्या जन्मदाखल्यामुळे स्पष्ट झाले आहे. समीर वानखेडे यांचा जन्मदाखला आणि शाळेचा दाखला तसेच इतर काही कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत. समीर वानखेडे यांनी १९९३ मध्ये खऱ्या कागदपत्रांमध्ये खाडाखोड करुन नवीन दाखले काढले. यामध्ये त्यांनी जुने रेकॉर्ड देखील नष्ट केले पंरतु ते विसरले की महानगरपालिकेतील सर्व कागदपत्र स्कॅन करुन ठेवले आहेत. त्यामुळे ते अजूनही आहेत. कोणीही कम्प्यूटरमधून काढून घेऊ शकतात असे नवाब मलिक म्हणाले. वानखेडेंच्या नव्या जन्मप्रमाणपत्रावर हिंदू असा उल्लेख आहे परंतु ते जन्मप्रमाणपत्र खोटं असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

अनिल देशमुखांना भाजपच्या मदतीने अडकवले

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी खंडणीचे खोटे आरोप करुन अडकवले आहे. परमबीर सिंह यांनी यासाठी भाजपची मदत घेतली आहे. सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांनी राज्य सरकारला अंधारात ठेऊन गैर कृत्ये केली आहेत. हे सर्व समोर येणार आल्यावर आपल्याला अटक होणार हे त्यांना माहिती होते त्यामुळे त्यांनी भाजपच्या मदतीने अनिल देशमुख यांना अटकवण्याचा कट रचला आहे. असे आमचं स्पष्ट मत असल्याचे नवाब मलिक म्हणाले.


हेही वाचा : समीर वानखेडेंच्या जन्मदाखल्यासह इतर कागदपत्रे बनावट, नवाब मलिकांचा आरोप