Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रNawab Malik controversy : अजित पवारांबाबतचे पत्र कोणाला लिहिणार? सुषमा अंधारेंचा फडणवीसांना प्रश्न

Nawab Malik controversy : अजित पवारांबाबतचे पत्र कोणाला लिहिणार? सुषमा अंधारेंचा फडणवीसांना प्रश्न

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक यांच्या विधानसभेतील उपस्थितीवरून वाद आणखी रंगला आहे. त्यावरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी जोरदार टीका केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित यांना पत्र लिहून नवाब मलिक यांच्या सत्तेतील सहभागावर आक्षेप घेतला आहे. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांचा समाचार घेतला आहे. अजित पवार यांच्याबद्दल भाजपाच्या कोणत्या नेत्याला तुम्ही पत्र लिहिणार आहात, असा थेट सवाल त्यांनी केला आहे.

हेही वाचा – Fadnavis Letter Bomb : नवाब मलिक यांना महायुतीत घेऊ नका…..देवेंद्र फडणवीस यांचे अजित पवार यांना पत्र

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज, गुरुवारपासून नागपुरात सुरुवात झाली. वैद्यकीय जामीनावर कारागृहाबाहेर आलेले आमदार नवाब मलिक हे विधानसभेत थेट सत्ताधारी बाकांवर बसले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री असलेल्या नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कथित संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे त्यावेळी विरोधात असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांना देशद्रोही म्हटले होते. पण तेच मलिक आता सत्तेत सहभागी झाल्याने फडणवीस यांच्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र पाठविले आहे. ज्या पद्धतीचे आरोप नवाब मलिक यांच्यावर आहेत, ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – Nawab Malik : विरोधक आक्रमक झालेले असतानाच भाजपा नेता म्हणतो, मलिकांचे हे शेवटचे अधिवेशन

यावरून सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना, हे पत्र म्हणजे ट्रोल झाल्यानंतरची ही उपरती असल्याचे म्हटले आहे. सत्तेपेक्षा देश मोठा असे फडणवीस यांना वाटत असेल तर, आतापर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना सत्तेत सामावून घेताना हा विवेकवाद कुठे गेला होता? ज्यांच्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन आणि बँक घोटाळ्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता, त्याच अजित पवार यांना 48 तासांच्या आत सत्तेत सहभागी करून घेतले आणि त्यांनाच फडणवीस यांनी पत्र दिले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अजित पवार यांना सत्तेत सामावून घेणे चुकीचे आहे, असे सांगणारे पत्र तुम्ही कोणत्या भाजपा नेत्याला लिहाल, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.