जेलमध्ये नवाब मलिकांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी जे.जे रुग्णालयात दाखल

Nawab Malik health deteriorated collapsed in jail court said hospitalized for treatment
जेलमध्ये नवाब मलिकांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी जे.जे रुग्णालयात दाखल

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना जे.जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नवाब मलिक जेलमध्ये पडले तसेच त्यांची प्रकृती ढासळली असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी कोर्टात दिली होती. कोर्टाने नवाब मलिकांना जे.जे रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी दिली असून वैद्यकीय अहवालसुद्धा सादर करण्यास सांगितले आहे. मलिकांना टेरर फंडिंग आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने अटक केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक गेल्या तीन दिवसांपासून आजारी असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. नवाब मलिक यांची प्रकृती ढासळली असल्यामुळे जामीन याचिका पीएमएलए कोर्टात करण्यात आली होती. परंतु नवाब मलिकांच्या जामीन याचिकेवर जोरदार विरोध केला. कोर्टाने मलिकांना जे.जे रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी दिली आहे. मलिक यांना जेलमधून स्ट्रेचरवरुन जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नवाब मलिकांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार नवाब मलिकांची तब्येत मागील काही दिवसांपासून बिघडली आहे. तसेच त्यांना आज स्ट्रेचरवरुन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना आर्थर रोड जेलमधून जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच ईडीने कोर्टात सवाल केला आहे की, महाराष्ट्राचे मंत्री आजारी होते तर आम्हाला कळवण्यात का आले नाही? यामुळे पुढील सुनावणी घ्यावी परंतु कोर्टाने आरोपीची तब्येत महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांना रुग्णलयात दाखल करण्याची परवानगी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

पीएमएलए कोर्टाने नवाब मलिकांना ६ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नवाब मलिकांनी पीएमएलए कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वाच्च न्यायालयात दाखल केली होती. परंतु याचिका स्वीकारण्यास कोर्टाने नकार दिला आहे. तपासादरम्यान आम्ही हस्तक्षेप करणार नाही. अशा स्थितीत योग्य न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात यावा असे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा : कुणाचीही हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही, अजित पवारांचा राज ठाकरेंना इशारा