“मी दुबईला चाललोय” सरकारी यंत्रणांनी माझ्यावर नजर ठेवावी, मलिकांच्या ट्विटचा रोख कुणावर?

Nawab malik tweet visit to dubai all government agencies to keep an eye on me and track my movement
"मी दुबईला चाललोय" सरकारी यंत्रणांनी माझ्यावर नजर ठेवावी, मलिकांच्या ट्विटचा रोख कुणावर?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री गेल्या दीड महिन्यापासून प्रचंड चर्चेत आहेत. याचे कारण म्हणजे त्यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर केलेले आरोप आहेत. नवाब मलिक हे दुबई दौऱ्यावर निघाले आहेत. मलिकांनी स्वतःच्या दुबई दौऱ्याची माहिती देत माझ्यावर सरकारी यंत्रणांनी नजर ठेवावी असे ट्विट करुन सांगितले आहे. दरम्यान नवाब मलिक यांनी असे का सांगितले असा सर्वांनाच प्रश्न पडला आहे. राजकीय वर्तुळात मलिकांच्या ट्विटवर तर्क वितर्क लढवण्यात येत आहेत. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी आंतरराष्ट्रीय प्रवासावरुन अनेक आरोप केले आहेत. यामुळे नवाब मलिकांनी आपण बाहेर जात असून आपल्यावर नजर ठेवावी असे तर सांगितले नाही ना? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या ट्विटमुळे सर्वांमध्ये एकच उत्सुकता निर्माण झाली आहे. ती म्हणजे नवाब मलिक नक्की कशासाठी दुबई दौरा करत आहेत. तसेच नवाब मलिकांच्या दौऱ्यामागे कारण काय? नवाब मलिक यांनी सगळ्यांना आपण दुबई दौऱ्यावर जात असल्याची माहिती दिली आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी कोरोना काळात दुबईचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये वानखेडेंनी वसुली केली असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. दुबई दौऱ्यामुळे आपल्यावरही आरोप करण्यात येतील म्हणून नवाब मलिक यांनी दौऱ्याची माहिती दिली असावी.

नवाब मलिक यांनी ट्विट करत दुबई दौऱ्याबाबत माहिती दिली आहे. ट्विट करत नवाब मलिक म्हणाले की, “सर्वांना नमस्कार, मला सगळ्यांना सांगायचे आहे की, मी दुबई दौऱ्यावर असून केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे सर्व आवश्यक परवानगी घेतली आहे. २४ नोव्हेंबर बुधवारी रोजी मी भारतात दाखल होईल. त्यामुळे सर्व सरकारी यंत्रणांना विनंती आहे की, त्यांनी माझ्यावर बारकाईने लक्ष ठेवावे” असे ट्विट नवाब मलिक यांनी केले आहे.

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या परदेश दौऱ्यावर नवाब मलिक यांनी अनेक सवाल केले आहेत. वानखेडे यांनी वसुलीसाठी दौरा केला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे आता मलिकांच्या दौऱ्यावरही तसेच आरोप होऊ शकतात. नवाब मलिक सध्या चर्चेच्या फेऱ्यात आहेत त्यामुळे ते अचानाक गायब झाल्यावर त्यांच्यावर आरोप होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हे नवाब मलिक यांना समजले असावे यामुळेच नवाब मलिक यांनी खोचक ट्विट करत आपल्याच दौऱ्याची माहिती दिली असावी.


हेही वाचा : नवीन दाखल्याच्या आधारावर वानखेंडेंचा शाळेतील प्रवेश, जात प्रमाणपत्रावर मलिकांचा खुलासा