आर्यन खानला जाणीवपूर्वक गोवले, एनसीबीच्या अंतर्गत अहवालात धक्कादायक दावा

ncb Internal report claims that Aryan Khan was deliberately targeted
आर्यन खानला जाणीवपूर्वक गोवले, एनसीबीच्या अंतर्गत अहवालात करण्यात आला दावा

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान क्रूज ड्रग्ज प्रकरणात निर्दोश असल्याचे सिद्ध झाले आहे. आर्यनच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा एनसीबीच्या हाती लागलेला नाही. आर्यनला क्लीन चित मिळाल्यानंतर एनसीबीने त्याला जाणीवपूर्वक गोवले होते, असा दावा एनसीबीच्या अंतर्गत अहवालात करण्यात आला आहे. या अहवालात स्पष्टपणे एकूण चौकशी पाहता, तपास अधिकारी शाहरुखचा मुलगा आर्यनला गुंतवण्याच्या प्रयत्नात होते, असे नमूद करण्यात आले आहे. यामुळे या प्रकरणात एनसीबीचे तत्कालीन मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडेंच्या अडचणी वाढनार आहेत. एसआयटीने आपल्या रिपोर्टमध्ये या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

फोन जप्त न करता व्हॉट्सअॅप चॅट वाचले-

या प्रकरणातील दुसरा आरोपी अरबाज मर्चंटने ड्रग्जचा आर्यनशी काहीही संबंध नाही, असे सांगितलेले असतानाही, तपास अधिकाऱ्यांनी आर्यन खानचे फोन अधिकृतरित्याजप्त न करताही त्यावरील व्हॉट्सअप चॅट वाचले आणि त्याची माहिती माध्यमांपर्यंतही पोहचली. अरबाज मर्चंट हा आर्यन खान याचा मित्र आहे. त्याच्याकडून एनसीबीने कथित सहा ग्रॅम चरस जप्त केले आहे.

तपास अधिकाऱ्यांवर प्रश्नचीन्ह –

या प्रकरणात एनसीबीच्या कारवाईत अनेक त्रुटी होत्या, असे एसआयटीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीत तपास अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येऊ शकते. ड्रग्जच्या प्रकरणात आरोपींकडे ड्रग्ज सापडलेले नसले आणि ठोस पुरावे नसले तर कोर्ट अशा आरोपींना सोडून देण्याची शक्यताच जास्त असते.

मुंबई पोलिसांनी केला क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास बंद –

एनसीबीने या प्रकरणात आर्यन खानला क्लीन चिट दिली आहे. मुंबई पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास आता थांबवला आहे. मुंबई पोलीसही या प्रकरणाची चौकशी करीत होते. मात्र, त्यांच्या तपासात आत्तापर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नव्हती. या प्रकरणात कोणतेही पुरावे मिळाले नसल्याने एकही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले.