डोंबिवलीत जिममध्ये घुसून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण, राजकीय वाद विकोपाला

crime

डोंबिवली – सध्या राज्यातील सत्तेचे केंद्र हे ठाणे असले तरी राजकारणाचे केंद्र हे डोंबिवलीच राहिले आहे. यापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना शिवसेना विरुद्ध भाजपा, शिवसेना विरुद्ध मनसे असा वाद व्हायचा. आता राज्यात सत्ता बदल झाला आहे. मात्र डोंबिवलीतील राजकीय वाद व राडा काही थांबलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ब्रह्मा माळी यांना जीममध्ये शिरून भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यामुळे हा राजकीय वाद विकोपाकडे गेला असून या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी दोन्ही गटाच्या तक्रारी घेत दोघांच्या विरोधात कारवाई सुरु केली आहे.

आगामी काळात केडीएमसीच्या निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते निवडणूक जिंकण्यासाठी कामाला लागले आहेत. डोंबिवलीतील भोपर परिसरात राजकीय वर्चस्वातून वाद वाढला असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ब्रम्हामाळी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कल्याण डोंबिवलीचे सरचिटणीस आहेत. बुधवारी सकाळी जीममध्ये घुसून त्यांना मारहाण करण्यात आली. ही मारहाण भाजप कार्यकर्ता कुंदन माळी आणि त्याच्या साथीदारांनी केली असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

भाजप कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, ब्रम्हा माळीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना देखील मारहाण केली आहे. वादामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. या घटनेनंतर डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. पोलिसांनी निपक्षपाती कारवाई करावी, अशी त्यांची मागणी होती. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची तक्रार दाखल करुन घेतली आहे.

कुंदन माळी आणि त्यांच्या तीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. ब्रम्हामाळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात देखील कारवाई केली जाईल. हा वाद राजकीय असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र अधिक बोलण्यास नकार दिला आहे.


हेही वाचा : ठाण्याच्या जांभळीनाक्यावरील दहीहंडीत निष्ठेचे थर, खासदार राजन विचारेंचा शिंदे गटाला टोला