ठाणे – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएम हे महायुतीच्या विजयाचे खरे कारण असल्याचा आरोप केला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना खुले आव्हान दिले आहे. ते म्हणाले, “जितेंद्र आव्हाड यांना माझे खुले आव्हान आहे. त्यांना जर वाटत असेल ईव्हीएम मशीन हॅक होते. त्यांनी त्यांचा आमदारकीचा राजीनामा द्यावा. आपण बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातली निवडणूक ही मुंब्रा-कळवा विधानसभेत घेऊ, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल,” असे ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अवघ्या 10 जागा मिळाल्या. त्यानंतर ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्या जात आहेत. लोकसभेला शरद पवारांचे आठ खासदार निवडून आले होते. त्यामुळे जनता महाविकास आघाडीच्या पाठीमागे असल्याचे वाटत होते. मात्र विधानसभेत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आहे. त्यानंतर शरद पवारांचे ठाण्यातून विजयी झालेले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील ईव्हीएमवर टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर माजी खासदार आनंद परांजपेंनी त्यांना आव्हान दिले आहे. “जितेंद्र आव्हाड यांना माझं खुलं आव्हान आहे. त्यांना जर वाटत असेल ईव्हीएम मशीन हॅक होते. त्यांनी त्यांचा आमदारकीचा राजीनामा द्यावा. आपण बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातली निवडणूक ही मुंब्रा-कळवा विधानसभेत घेऊया, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल”, असे आव्हान दिले आहे.
लोकसभेत मिळालेले यश सामान्य जनतेमुळे मिळालं, अशा प्रकारची यशोगाथा ते सांगत फिरत होते. या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आलेले यश नाकारण्याचा महाविकास आघाडीचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. लोकसभेला यश मिळालं ते महाराष्ट्राच्या जनतेमुळे मिळालं आणि विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने नाकारल्यानंतर ईव्हीएम हॅक झालं अशाप्रकारे रडीचा डाव सुरू आहे, असं आनंद परांजपे म्हणाले.
हेही वाचा : VBA : वंचितच्या उमेदवाराला 99 मतं; जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा धुडगूस
Edited by – Unmesh Khandale