धाराशिव – सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक करडा, विष्णू चाटे यांच्यासोबतच्या संबंधावरुन मंत्री धनंजय मुंडेंवर विरोधक निशाणा साधत आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर काय चर्चा होत आहे, यासंबंधी मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती दिली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षासोबतच स्वपक्षीयांसह महायुतीतील आमदार देखील करत आहेत. मात्र अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना अभय दिले आहे. त्यावरुन पक्षाच्या बैठकीत काय चर्चा होत आहे, याबद्दल आमदार विक्रम काळे यांनी माध्यमांकडे खुलासा केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सध्या पोटदुखीच्या कारणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत आहे. वाल्मिक कराडचे हे नाटक सुरु असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींना उचलून आर्थररोड तुरुंगात टाकले पाहिजे, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. तर धनंजय मुंडे यांच्या हस्तक्षेपामुळेच आरोपींना व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी शरद पवार गटाचे आमदर तसेच भाजप आमदार सुरेश धस करत आहेत.
राष्ट्रवादीच्या बैठकीत मुंडेच्या राजीनाम्यावर काय चर्चा ?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) आमदारांची दर मंगळवारी बैठक होते. या बैठकीत मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्यावर काय चर्चा झाली, याबद्दल पक्षाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांना पत्रकारांनी विचारले. यावर आमदार काळे म्हणाले की, या मंगळवारी पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. परंतु जर कोण मस्साजोग हत्या प्रकरणात दोषी असेल तर योग्य वेळी योग्य निर्णय पक्ष घेईल, त्याच बरोबर मस्साजोग या प्रकरणात कोणालाही आमचा पक्ष आणि सरकार पाठीशी घालणार नाही. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल,” असं विक्रम काळे म्हणाले.
हेही वाचा : Amit Shah : शरद पवार साहेब मार्केटिंग नेता बनून फिरणं पुरेसं नाही; अमित शहांनी मागितला दहा वर्षांचा हिशेब