पोलिसांच्या सोयी-सुविधा व घरांसाठी अधिकचा निधी देणार, अजित पवारांचे आश्वासन

ncp ajit pawar said will provide more funds for police facilities and houses
पोलिसांच्या सोयी-सुविधा व घरांसाठी अधिकचा निधी देणार, अजित पवारांचे आश्वासन

पोलिसांच्या सोयी-सुविधा व घरांसाठी अधिकचा निधी देणार असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. अजित पवार यांनी शिर्डी विमानतळाच्या विकासासाठी १५० कोटींचा निधी व ग्रीन फिल्डचा दर्जा देणार असल्याचे सांगितले आहे. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाबरोबरच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरे मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे‌. यासाठी पोलिसांच्या सोयी-सुविधांसाठी जुलै महिन्यातील अधिवेशनात अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अंमलदारांच्या ११२ निवासस्थानांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन झाले. देश अमृतमहोत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने जीर्ण झालेल्या राज्यातील ७५ पोलीस ठाण्याचे बांधकाम करण्यात येईल. तसेच राज्यात पोलिसांच्या विविध गृहनिर्माण कार्यक्रमास ८६० कोटी उपलब्ध करून दिले आहेत. या निधीत जूलै अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये अधिक वाढ करण्यात येईल असा शब्द राज्याच्या गृहमंत्र्यांना दिला.

पोलिसांसाठी ५३५ स्क्वेअर फुटांचे साडेसहा हजार फ्लॅट शासनाने राज्यात उपलब्ध करून दिले आहेत. या बांधकामांच्या दर्जात कुठेही तडजोड करण्यात आली नाही असेही अजित पवार म्हणाले. पोलीस दलाचे मनोबल उंचावण्यासाठी आधुनिक शस्त्रास्त्रे, संपर्क यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा व वेगाने धावणाऱ्या गाड्या या सुसज्ज साधनांसोबत स्मार्ट पोलिसिंग व ई-ऑफिसचे काम करण्यात येत आहे. याबरोबरच पोलीस दलाची मान खालावली जाईल असे काम पोलिसांनी करू नये असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. गुन्हे कमी करण्यासाठी पोलीस दलासोबत इतर विभागांनीही एकमेकांमध्ये समन्वय ठेवून काम करावे. गुन्हे कमी झाल्यास राज्याचे उत्पन्न वाढते. जिल्हा नियोजनमधून पोलिसांना वाहने उपलब्ध करून देण्यात येतील.

शिर्डी विमानतळ विकासासाठी १५० कोटी

शिर्डी शहर व परिसराचा विकास करण्यासाठी शिर्डी विमानतळाचे बळकटीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी १५० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे‌. त्यातून कॉर्गा टर्मिनल, नाईट लँडींग या सुविधा सुरू करण्यात येतील. यातून कृषी मालाची वाहतूक जलदगतीने होईल. यावर्षी शिर्डी, नवी मुंबई व सिंधुदुर्ग या विमानतळांना ग्रीन फिल्ड दर्जा देण्यात आला आहे.

गृहविभाग पोलीस दलाच्या पाठीशी

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राज्यातील पोलिसांना सुसज्ज घरे मिळाल्यास त्यांच्या कार्यक्षमतेत निश्चित वाढ होणार आहे. राज्यातील पोलिसांना पुढील दोन महिन्यांत ६८५३ घरे उपलब्ध करून देण्यात येतील. शासनाने एसआरपीएफमधील पोलिसांना राज्य पोलिसात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस शिपायास निवृत्तीपर्यंत पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात पोलिसांनी रस्त्यावर येऊन चोवीस तास काम केले. गृहविभाग पोलिसांना घरे व विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे‌. राज्यात धार्मिक तेढ व अशांतता निर्माण होणार नाही. यासाठी काम करावे असेही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.


हेही वाचा : ST Strike : संपकरी ST कर्मचाऱ्यांना हायकोर्टाकडून ९ दिवसांचा अल्टिमेटम तर राज्य सरकारला आवाहन