आघाडीत बिघाडी! विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवेंच्या नियुक्तीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस नाराज

मुंबई – विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीवरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षेनेतेपदासाठी अंबादास दानवे यांच्या नावाची शिफारस करून तशी घोषणा करताना विश्वासात घेतले नसल्याची कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची तक्रार आहे. त्यामुळे राज्यातील सत्तांतरानंतर आघाडीतील मतभेद समोर आले आहेत.

राज्यात सत्तांतर होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षेनेतेपद राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळाले. विधान परिषदेत उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे. विधिमंडळात काँग्रेसकडे कोणतेही घटनात्मक पद नाही. त्यामुळे कॉंग्रेसला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद हवे होते. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे विरोधी पक्षनेते पदासाठी अंबादास दानवे यांच्या नावाची शिफारस केली. ही शिफारस तत्काळ मान्य करून डॉ. गोऱ्हे यांनी दानवे यांच्या नावाला मान्यता दिली.

हेही वाचा –  जितेंद्र आव्हाड अडचणीत; अनंत करमुसेप्रकरणी कारणे दाखवा नोटीस

विधान परिषदेत शिवसेनेचे १२ तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रत्येकी १० सदस्य आहेत. त्यामुळे संख्याबळाच्या आधारे विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेचा दावा रास्त आहे. परंतु, विरोधी पक्षेनेते पदाचा निर्णय घेताना आघाडीतील मित्र पक्षांशी चर्चा अपेक्षित होती. ही चर्चा न करता शिवसेनेने परस्पर दानवे यांचे नाव दिल्याने दोन्ही कॉंग्रेस नाराज आहेत. वास्तविक विरोधी पक्षनेते पदाची घोषणा सभागृहात केली जाते. मात्र, दानवे यांच्या नावाची घोषणा अधिवेशन नसताना झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

हेही वाचा – शिंदे गटाची बाळासाहेबांशी आस्था की लालसा हे जनतेला माहिती, महेश तपासेंचा हल्लाबोल

कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरून नाराजीला तोंड फोडले. अशी निवड करताना शिवसेनेने चर्चा करायला हवी होती, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही चर्चा न करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदाची निवड करताना महाविकास आघाडी म्हणून चर्चा होणेआवश्यक होते . मात्र, तशी चर्चा करण्यात आली नाही. आम्हाला विचारात घेतले गेले नाही. निवड कुणाचीही होवो, पण चर्चा होणे गरजेचे होते . त्यामुळे आमचा या निवडीला विरोध आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही शिवसेनेने विधान परिषद विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय घेताना इतर दोन पक्षांशी चर्चा केली असती तर ते अधिक चांगले झाले असते, असे म्हटले आहे. राष्ट्रवादीने विधानसभेत अजित पवार यांच्या नावाचे पत्र देण्याआधी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरातांशी चर्चा केली होती. ज्यांच्याकडे जास्त संख्याबळ आहे त्यांचा विरोधी पक्षनेता होतो अशी पूर्वीपासूनची परंपरा आहे. असे असले तरी विरोधी पक्षनेता नेहमीच इतरांचाही पाठिंबा घेण्याचा प्रयत्न करतो, असे पाटील यांनी सांगितले.