एकनाथ खडसे यांचं राजकीय पुनर्वसन होणार, विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून दोन नावांची घोषणा

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना राष्ट्रवादीने संधी दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली

eknath khadse

राज्यसभेच्या निवडणुकांची धाकधुकी सुरू असतानाच विधान परिषदेच्या निवडणुकाही लागल्या आहेत. येत्या २० जून रोजी विधान परिषदेच्या निवडणुका होतील. दरम्यान, भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसनेही दोन उमेदवार जाहीर केले आहेत. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना राष्ट्रवादीने संधी दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली. (NCP announces candidature for Legislative Council including eknath khadase)

हेही वाचा – जप्त केलेली संपत्ती खाली करा, ईडीची एकनाथ खडसेंना नोटीस

राष्ट्रावादीचे नेते जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येत्या विधान परिषद निवडणुकीसाठी रामराजे नाईक निंबाळकर आणि श्री. एकनाथराव खडसे हे उमेदवार असतील. दोन्ही उमेदवार विजयी होऊन महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहतील, असा आम्हाला विश्वास आहे.”

हेही वाचा – राज्यात भोंग्यांवरुन जे काही चाललंय ते मनोरंजन म्हणून पाहा, एकनाथ खडसेंचे वक्तव्य

भाजपमध्ये ४० वर्षे राहिलेल्या एकनाथ खडसे यांनी गेल्यावर्षी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून त्यांना नेमकी कोणती जबाबदारी देणार, त्यांचे राजकीय पुनर्वसन कसे होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. दरम्यान, आज विधान परिषदेसाठी त्यांचं नाव जाहीर झालं आहे.

विधान परिषदेसाठी नाव जाहीर होताच एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपने अडगळीत टाकलं पण राष्ट्रवादीने आधार दिला. भाजपने फक्त गाजर दाखवलं म्हणून राष्ट्रवादीत यावं लागलं. पण शरद पवारांनी दाखवलेल्या विश्वासाचं चीज करून दाखवेन. राष्ट्रवादीने मला आधार दिला. त्यामुळे मी त्यांचा नेहमी ऋणी राहिन, अशा शब्दांत त्यांनी आभार मानले.

दरम्यान, राष्ट्रवादीकडून एक अतिरिक्त अर्ज भरण्याचे ठरवण्यात आले आहे. पक्षात कुणाच्या नावाला विरोध नव्हता. एकमताने हा निर्णय पक्षाने घेतला आहे. या दोन ज्येष्ठ नेत्यांना संधी पक्षाने द्यायचा निर्णय घेतला आहे. बाहेर ज्या बातम्या आहेत त्या पूर्णपणे खोट्या व चुकीच्या आहेत असेही जयंत पाटील म्हणाले.

सरकार पाडण्याचे भाजपचे सर्व प्रयत्न फसले असल्यामुळे सध्या घोडेबाजार करायच्या मनस्थितीत दिसते. तोच प्रयत्न राज्यसभा निवडणुकीत चालला आहे. सुदैवाने राज्यसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत आमदारांना आपलं मत दाखवण्याची तरतूद आहे परंतु अपक्षांना नाही त्यामुळे ते सर्व अपक्षांच्या मागे लागले आहेत असेही जयंत पाटील म्हणाले.

भाजपचे १०६ आमदार आणि पाठिंबा दिलेले काही आमदार आहेत त्यांच्या जीवावर निवडून येतील तेवढे निवडून आणणं हे लोकशाही सुदृढ ठेवणं योग्य होतं, पण इतर पक्षाचे आमदार खेचून आणण्याचा जो प्रकार सुरु आहे तो योग्य नाही. लोकशाहीच्या प्रथा, परंपरा व लोकशाहीत घोडेबाजार होऊ न देणं या सगळ्या चौकटीत राहून काम करणं गरजेचं आहे, असेही जयंत पाटील यांनी भाजपला सुनावले आहे.