राष्ट्रवादी काँग्रेसकडून रुपाली पाटील ठोंबरे यांना मोठी जबाबदारी, ‘या’ पदावर नियुक्ती

पक्षानं दाखवलेल्या विश्वासाला दमदार कामातून नक्की सार्थ करणार असल्याचे रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे.

NCP appoints Rupali Patil Thombre to be a Pune City Vice President
राष्ट्रवादी काँग्रेसकडून रुपाली पाटील ठोंबरे यांना मोठी जबाबदारी, 'या' पदावर नियुक्ती

मनसेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या फायरब्रँड नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांना पक्षानं मोठी जबाबदारी दिली आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेतून जाहीर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटावर बांधले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रुपाली पाटील यांना मोठे पद देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर राष्ट्रवादीकडून रुपाली पाटील यांना पुणे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील फायरब्रँड नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांना पक्षाकडून पदावर नियुक्त करण्यात आले आहे. रुपाली पाटील आक्रमक नेत्या आहेत. त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे त्यांना चांगल्या पदावर नियुक्त करण्यात येईल अशी चर्चा होती. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर उपाध्यक्ष पदावर रुपाली पाटील ठोंबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपाध्यक्षपदाचा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रुपाली पाटील यांच्याकडे जाईल अशी चर्चा होती. परंतु रुपाली पाटील यांना त्यावेळी ते पद देण्यात आले नाही.

रुपाली पाटील यांना पक्षाकडून देण्यात आलेल्या पत्रातून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या पत्रात असे म्हटलं आहे की, आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (मंत्री, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार आपल्या पक्षाची विचारधारा व तत्वांना केंद्रस्थानी ठेवून पक्षाच्या विस्ताराथ आणि संघटन वाढवण्यासाठी आपण यशस्वी वाटचाल कराल व आपल्या सक्षम कृतीतून जनसामान्यांच्या मनात आपल्या पक्षाची प्रतिमा उत्तरोत्तर अधिक उज्ज्वल कराल, असा विश्वास आहे. आपल्या निवडीबद्दल अभिनंदन आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा रुपाली पाटील यांना देण्यात आल्या आहेत.

रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षातील नेत्यांचे आभार मानले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, शहर अध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी दाखवलेल्या विश्वासाला दमदार कामातून नक्की सार्थ करणार असल्याचे रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : बैल कधी एकटा येत नाही तर तो नांगरा…, बैलगाडी शर्यतीवेळी देवेंद्र फडणवीसांनी ऐकवला डायलॉग