छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. भारतीय जनता पक्षाला 132 जागांवर विजय मिळाला आहे, तर महायुतीला 230 जागांवर विजय मिळाला आहे. मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय उद्या दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबतच्या बैठकीत होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दिली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन भाजपचे केंद्रीय नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे सांगून भाजप नेत्यांची मोठी चिंता दूर केली आहे. त्यानंतर अजित पवारांनी महायुतीचा पुढील दोन-तीन दिवसांचा कार्यक्रमच जाहीर केला आहे.
अजित पवार म्हणाले की, 23 तारखेला निकाल लागला. महाराष्ट्रने एकतर्फी निकाल दिला. महाराष्ट्रने आजपर्यंत कधीच असा निकाल दिला नव्हता. काँग्रेसचा विक्रम मोडला गेला, त्याबद्दल महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, सर्वांचे आभार. आता आमची जबाबदारी वाढली आहे.
मुख्यमंत्री पदाबद्दलचा निर्णय केंद्रीय नेत्यांसोबतच्या बैठकीत होणार असल्याचे सांगताना अजित पवार म्हणाले की, उद्या मी, फडणवीस आणि शिंदे पुढील चर्चेसाठी दिल्लीला जाणार आहे. त्यानंतर नवीन मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असं सरकार स्थापन होईल. असंही अजित दादांनी सांगितलं.
नागपूरला अधिवेशन आहे पुरवण्या मागण्या मान्य कराव्या लागतील. कामाचे प्रेशर राहणार आहे. आमचा अनुभव असल्यामुळे अडचणी येथील असं मला वाटत नाही. सर्व समाजाला सोबत नेण्याचा प्रयत्न करणार आहे. उद्या दिल्लीला गेल्यानंतर लोकसभेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे मी प्रमुखांना पण भेटणार आहे. खेळीमेळीच वातावरणात महायुतीच्या सरकार स्थापन होईल, असा दावा अजित पवारांनी केला.
एकनाथ शिंदेंकडे कोणते मंत्रालय ?
एकनाथ शिंदे यांनी काय करावं, त्यांच्या वाट्याला किती जागा येतील, किती पदे येतील, त्याबाबत सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे. आमच्या बाजूचा निर्णय आम्ही घेऊ त्यांच्या बाबतचा निर्णय मी कसा सांगणार? असं अजित पवार म्हणाले.
शेवटी संख्येचा खेळ
मुख्यमंत्रीपदावर अजित पवार म्हणाले की, कार्यकर्त्यांना काही जरी वाटत असलं तरी प्रत्येकाची संख्या किती आली? किती लोक निवडून आले, हे पाहिलं जातं. मागच्या अडीच वर्षांपूर्वीची गोष्ट वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे.
शपथविधी केव्हा होणार?
अजित पवार यांनी महायुती सरकारचे पुढील दोन, तीन दिवसांतील कार्यक्रमांची जंत्रीच पत्रकारांसमोर मांडली. ते म्हणाले, नव्या सरकारचा शपथविधी या महिन्याच्या शेवटी 30 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे किंवा 1 डिसेंबरला होईल असे अजित पवार म्हणाले.
अजित दादांना आताच मुख्यमंत्री करा, असं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, बाकीच्यांनी फुकटचा सल्ला द्यायची गरज नाही. आम्ही आणि आमचा पक्ष आमदार कार्यकर्ते पाहून घेऊ, असा टोला त्यांनी रोहित पवारांना लगावला.
हेही वाचा : Election 2024 : महापालिका निवडणुकीबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे मोठे वक्तव्य; …तर बहिष्कार
Edited by – Unmesh Khandale