पवारांची क्रिकेटवरील पकड सैल झाली

Ncp Chief sharad pawar grip loose on mumbai cricket association MCA meeting hold without pawar presence
पवारांची क्रिकेटवरील पकड सैल झाली

गेल्या पाच दशकांत राजकारण, क्रीडा, साहित्य, नाट्य अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये मुशाफिरी करणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा क्रिकेट वर्तुळामध्ये एक वेगळाच दरारा आहे. त्या दरार्‍याला अनुसरूनच मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए)सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्याचे संकेत शरद पवार यांनी दिले होते. मात्र, त्याकडे सपशेल दुर्लक्ष करून एमसीएच्या सव्वाशे मतदारांनी गरवारे क्लब या पवारांच्या होमपीचवरच सर्वसाधारण सभा घडवून आणली आणि एक प्रकारे मुंबई क्रिकेटवरची पवारांची पकड पूर्णपणे ढिली झाल्याचे संकेत मिळून गेले. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली आहे.

एमसीएच्या सर्वसाधारण सभेत गेली तीन वर्षे हिशेब मांडलेला नाही. एमसीएची १९ मार्चला ८५वी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात तीन आर्थिक वर्षांचे एकत्र हिशेब दिले होते, परंतु असोसिएशनचे हिशेब तयार नसल्याचे खोटे कारण सांगून ही सर्वसाधारण बैठक पुढे ढकलण्याची गळ कार्यकारिणीतील विद्यमान सदस्यांनी शरद पवार यांना घातली होती. त्यानंतर आयपीएलच्या कामांचे निमित्त देऊन बैठक पुढे ढकलण्याचा घाट घालण्यात आला. चंद्रकांत खैरे विरुद्ध डॉ. शंकरराव काळे यांच्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेऊन आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत ११० मतदार हजर राहिले आणि त्यांनी माजी सदस्य श्रीपाद हळबे यांच्या अध्यक्षतेखाली १९ मार्चच्या सभेच्या अजेंड्यावर कामकाज चालवले. पवार यांनी ’इशारो इशारो में’ ही बैठक पुढे ढकलण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे श्रीपाद हळबे, रवी मांद्रेकर आणि रवी सावंत यांनी एकत्र येत मतदारांना सर्वसाधारण सभेला निमंत्रित करण्यासाठी पावले उचलली. या ’जागल्या’ त्रयीच्या प्रयत्नांना यश येऊ नये म्हणून त्यांना सभेसाठी एमसीए लाऊंजची जागाही नाकारण्यात आली होती. तरीही सुमारे ११० मतदारांनी या सभेला उपस्थिती लावली. या सभेसाठी अ‍ॅपेक्स समितीतील आठ सदस्य उपस्थित होते, मात्र त्यांनी आपली हजेरी लावली नाही.

अ‍ॅपेक्स समितीने सर्वसाधारण सभेला असलेले अधिकार काढून घेऊन निर्णयांचे मनमानी केंद्रीकरण आपल्याच हाती घेतले याचा संताप या सभेत व्यक्त करण्यात आला. ते अधिकार पुन्हा मिळावेत, अशी जोरदार मागणी मतदारांकडून करण्यात आली. तसेच शरद पवारांच्या दरार्‍यामुळे आणि सर्वसाधारण सभेतील त्यांच्या हस्तक्षेपामुळे अनेक वर्षे आपल्याला निर्भयपणे आपली मते मांडता आली नसल्याचा सूरही या सभेमध्ये काढण्यात आला. शरद पवार यांच्या इच्छेविरुद्ध बोलावण्यात आलेल्या मतदारांच्या या सभेत उपाध्यक्ष अमोल काळे आणि संयुक्त सचिव संजय नाईक यांच्या राजकीय आदेशानुसार झालेल्या थेट निवडीबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासमखास समजले जाणारे अमोल काळे आणि आशिष शेलार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे संजय नाईक यांच्या नेमणुका या पूर्णतः राजकीय प्रेरित असल्याबद्दलही मतदारांकडून राग व्यक्त करण्यात आला. गेल्या तीन वर्षांत या जोडगोळीने एकदाही हिशेब सभेसमोर मांडले नव्हते.

ही सर्वसाधारण सभा हिशेब तयार नसल्यामुळे पुढे ढकलण्याची सूचना करण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात सर्वसाधारण सभेची सूचना देताना तीन वर्षांचे हिशेब एकत्र पद्धतीने देण्यात आले होते. गेली काही वर्षे कमालीची मनमानी एमसीएमध्ये सुरू असून संघटनेतील मतदारांना फारसे महत्त्व न देण्याचा प्रघात सुरू झाला आहे. त्या विरोधात सूर काढणार्‍या या विद्रोही सर्वसाधारण सभेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या नियुक्तीला विरोध न दर्शवता संजय नाईक आणि अमोल काळे यांच्यावरच आपली तोफ डागली. या बैठकीला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता येत्या तीन महिन्यांत असाच प्रयत्न करून महत्त्वाच्या पदांवर बसलेल्या राजकीय नेत्यांकडून आपल्या बगलबच्च्यांना असोसिएशनमध्ये घुसवण्याचा एक कलमी कार्यक्रम हाणून पाडण्यासाठी आणि मुंबई क्रिकेट सुरक्षित हातात देण्यासाठी संकल्प करण्यात आला. यामुळे एरवी पवारांच्या फक्त डोळ्यांच्या इशार्‍यांवर चालणारी एमसीए हलकेच का होईना पण पवारांच्या हातून सुटत असल्याचे संकेत मिळाले आहेत.


हेही वाचा : Dabholkar murder case : नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणात मोठी घडामोड, ९ वर्षानंतर पटली खुन्यांची ओळख