घरताज्या घडामोडीहल्लीच्या राज्यपालांवर भाष्य न केलेले बरे, शरद पवार यांचा टोला

हल्लीच्या राज्यपालांवर भाष्य न केलेले बरे, शरद पवार यांचा टोला

Subscribe

विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावेळी प्रचंड गोंधळ झाला. या गोंधळामुळे राज्यपालांनी आपले भाषण सोडून सभागृहातून काढता पाय घेतला. त्यामुळे राज्यपाल सध्या टीकेचा विषय बनले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीही राज्यपालांवर टीका केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्रात आल्यानंतर अनेक प्रकार घडले. मी जेव्हा राज्यकर्ता म्हणून काम करत होतो तेव्हा अनेक चांगले आणि कर्तृत्ववान राज्यपाल बघितले. राज्यात पीसी अलेक्झांडर यांच्यासारखे कर्तृत्ववान राज्यपालही आम्ही पाहिले. पण हल्लीच्या राज्यपालांवर भाष्य न केलेले बरे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. राज्यपाल अभिभाषण अर्धवट सोडून गेल्याप्रकरणी बोलताना शरद पवारांनी घटनात्मक पदाच्या प्रतिष्ठेवरच बोट ठेवले आहे. तर तसेच घटनात्मक पदावरील नेमणुकांमध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना दखल न घेण्याचेही आवाहन त्यांनी केले.

- Advertisement -

राज्यपाल यासारख्या घटनात्मक पदावर कोणत्या व्यक्तीला नेमावे हा केंद्र सरकारचा अधिकार आहे. आता १२ आमदारांच्या नेमणुकांबाबत एक वर्ष होऊन गेले, तरीही आमदारांच्या नेमणुका केल्या जात नाही. जर राज्यपालांसारखी व्यक्ती निर्णय प्रक्रियेच्या माध्यमातून पदाची प्रतिष्ठा ठेवणार नसतील, राष्ट्रपती, पंतप्रधानांनी यासारख्या पदाचा विचार करावा, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले.

गेल्या पाच वर्षांत फडणवीस सरकारच्या काळात फोन टॅप होत होते. फोन टॅपिंगचे हे रेकॉर्ड मी बघितले आहे. गेली पाच वर्षे देवेंद्र फडणवीस सरकारचे नेतृत्व होते, तेव्हा हे कॉल केले होते. लोकशाही विरोधी भूमिका घेणार्‍यांनी अशा प्रकारची कामे अधिकार्‍यांकडून करून घेतली. आता अधिकार्‍यांवरही खटले टाकायची वेळ आली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांना अशा प्रकाराची झळ बसेल, असेही पवार म्हणाले.

- Advertisement -

अर्धवट कामाच्या उद्घाटनासाठी मोदी येत आहेत

मेट्रोच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (६ मार्च) पुण्यात येत आहेत. या दौर्‍यावर राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. मला मेट्रो दाखवली आहे. माझ्या लक्षात आले की सगळे काम काही झालेले नाही. मग अजूनही मेट्रोचे काम पूर्ण झालेले नाही त्या अर्धवट कामाचे उद्घाटन होत आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. पुण्यात अनेक उद्घाटनांचे कार्यक्रमही होत आहेत.त्याबद्दल काही तक्रार नाही. पण मेट्रोचे अजून कामच पूर्ण झालेले नाही. हा प्रकल्प सुरू व्हायला अजून अनेक दिवस लागतील. पण त्या कामाचे उद्घाटन होत आहे. या महत्त्वाच्या कार्यक्रमासोबतच युक्रेनमधील मुलांची सोडवणूक करणेही अधिक महत्त्वाचे आहे, असेही पवार म्हणाले.

मलिक यांच्यावर राजकीय हेतूने कारवाई

मंत्री नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने आणि राजकीय हेतूने कारवाई करण्यात आल्याचा दावा करत शरद पवार यांनी भाजप आणि ईडीवर निशाणा साधला. पवार म्हणाले, एखादा मुस्लीम कार्यकर्ता असला की त्याला दाऊदाचा जोडीदार म्हटले जाते. कारण नसताना आरोप केले जात आहेत. मला त्याची चिंता नाही. मलिक आणि त्यांच्या कुटुंबाला जाणीवपूर्वक यातना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, याविरोधात संघर्ष करू. मलिक यांना अटक झाली म्हणून का काढा? असा सवाल करत पवार यांनी भाजपला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर झालेल्या कारवाईची आठवण करून दिली. मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणात अटक केल्यानंतर राणे यांना मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय कुणी घेतला हे पाहण्यात किंवा वाचण्यात आले नाही. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत आहेत. त्यावेळी ते कदाचित त्याचा खुलासा करतील, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.


हेही वाचा : Disha Salian Case : राणे पिता-पुत्राची ८ तास चौकशी, दिशा सालियन प्रकरणात चौकशीसाठी पोलिसांची प्रश्नावली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -