छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बाबासाहेब पुरंदरेंनी अन्याय केला; शरद पवारांचा आरोप

छत्रपती शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरेंएवढा अन्याय कोणीच केला नाही. काही इतिहासकारांनी शिवचरित्राबाबात अर्धवट माहिती दिली, त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा समावेश होतो'', असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. पुण्यामध्ये शरद पवार यांनी 'शिवचरित्र आणि विचारप्रवाह' या श्रीमंत कोकाटे लिखित पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

Sharad pawar and babasaheb purandare

“छत्रपती शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरेंएवढा अन्याय कोणीच केला नाही. काही इतिहासकारांनी शिवचरित्राबाबात अर्धवट माहिती दिली, त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा समावेश होतो”, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. पुण्यामध्ये शरद पवार यांनी ‘शिवचरित्र आणि विचारप्रवाह’ या श्रीमंत कोकाटे लिखित पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या पुस्तक प्रकाशनानंतर शरद पवारांनी कार्यक्रमातील उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंवर निशाणा साधला. या कार्यक्रमाला कोल्हापुरचे शाहू छत्रपती, जयसिंगराव पवार आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली. (ncp chief sharad pawar slams historian and writer babasaheb purandare)

पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, “श्रीमंत कोकाटेंनी मेहनतीने खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु, काही इतिहासकारांनी शिवचरित्राबाबात अर्धवट माहिती दिली. भारतात अनेक राज्यकर्ते झाले. मौर्यांचे राज्य, अशोकाचे राज्य, यादवांचे राज्य होते. पण छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य यापासून वेगळे होते. कारण त्यांच राज्य कधी भोसल्यांचे राज्य झाले नाही ते रयतेचे राज्य म्हणूनच ओळखल गेले. महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख कुळवाडी भूषण असा केला. शिवछत्रपतींचा उल्लेख करताना काही जणांनी धर्मांध चित्र रंगवण्याचा, संकुचित चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण श्रीमंत कोकाटेंनी सत्य मांडलं”, असे ते म्हणाले.

“मी इग्लंडला गेलो होतो. तेव्हा तिथे ग्रँड डफचे चार खंड विकत आणले. महाराष्ट्रात काही ग्रंथ खुप खपले. घराघरात ठेवले गेले. त्या ग्रंथांमध्ये बाबासाहेब पुरंदरे यांच्या ग्रंथाचा समावेश होतो. माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बाबासाहेब पुरंदरेंएवढा अन्याय कोणी केला नाही. मात्र, श्रीमंत कोकाटे यांनी खरा इतिहास लिहिला आहे. संसदेचे अधिवेशन संपलं की मी या इतिहास संशोधकासोबत बैठक घ्यायला तयार आहे. वस्तुनिष्ठ इतिहास समोर येण्यासाठी प्रयत्न करायला तयार आहे”, असेही शरद पवार यांनी म्हटले.


हेही वाचा – चंद्रकांत पाटील म्हणतात, मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले