Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे शरद पवारच अध्यक्ष, ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

शरद पवारच अध्यक्ष, ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली राजीनामा मागे घेतल्यानंतर ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. फटाके फोडून, ढोल ताशाचा गजरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर आनंदोत्सव साजरा केला.

लोक माझे सांगाती, या आत्मचरित्राच्या प्रकाशन प्रसंगी शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या निर्णयास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध करण्यास सुरूवात केली होती. ठाणे शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालय तसेच यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ठाण मांडून समितीमधील सदस्यांवर दबाव प्रस्थापित करून राजीनामा फेटाळून लावावा, असा आग्रह धरला होता. त्यानंतर झालेल्या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा फेटाळण्यात आला.

- Advertisement -

शरद पवार यांचा राजीनामा फेटाळण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्ते एकवटले. या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, ढोल वाजवून, फटाके फोडून आनंद साजरा केला. यावेळी कार्यकर्ते “कहो एक बार फारसे… शरद पवार दिलसे; सबंध देशाचा एकच आवाज… शरद पवार , शरद पवार! अशा घोषणा देऊन जल्लोष केला.

यावेळी डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, माझे पहिल्या दिवसापासून एकच म्हणणे होते की, शरद पवार यांना राजीनामा देण्याचा अधिकार नाही. आम्हा कार्यकर्त्यांना असं वाऱ्यावर सोडून ते कसे काय राजीनामा देऊ शकतात?

- Advertisement -

सामान्य माणसे, शेतकरी शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी आग्रही होते, याबाबत विचारले असता,” शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्यानंतर जनरेशन गॅपचा फरक बाजूला पडला. पवारांचे वय ८३ वर्षे आहे. तरीही विशीतले तरूण आंदोलन करीत होते. पवारांनी राजीनाम्याचा मनोदय व्यक्त केल्यानंतर सामान्य माणूस हळहळला. म्हणूनच आपण ठामपणे सांगतोय की शरद पवार यांना राजीनामा देण्याचा अधिकार नाही”, असेही डाॅ. जितेंद्र आव्हाड म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुजाताताई घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप यांच्यासह विविध सेलचे अध्यक्ष, विधानसभाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, शहर कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हेही वाचा : BIG BREAKING : शरद पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष, राजीनामा मागे


 

- Advertisment -