नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने काल, मंगळवारी अजित पवार यांच्या गटाला खरी राष्ट्रवादी म्हणून घोषित केले. आयोगाच्या या निर्णयानंतर शरद पवार यांनी आज, बुधवारी नव्या पक्षासाठी तीन नावे आणि निवडणूक चिन्हे सुचवली होती. त्यानंतर आता निवडणूक आगोागकडून नाव घोषित करण्यात आलं आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ हे नाव देण्यात आलं आहे. राज्यसभा निवडणुकांसाठी हे नाव देण्यात आलं आहे. 27 फेब्रुवारीपर्यंतच हे नाव वैध राहणार आहे. (NCP Done Nationalist Congress Party Sharad Chandra Pawar The new name of Sharad Pawar s party)
राज्यसभा निवडणुकीत चिन्हाला महत्त्व नसतं. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीसाठी तात्पुरत्या कालावधीपुरता हे नाव देण्यात आलेलं आहे. शरद पवार गटाला पुन्हा 27 फेब्रुवारीला पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी अर्ज करावा लागणार आहे.
या चिन्हासाठी पवार गट आग्रही
निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिल्यानंतर त्यांना पक्षाचं नाव आणि चिन्हाची सूचना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर दिलेल्या पर्यायांमधून शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव देण्यात आलं आहे.
शरद पवार गट हा वटवृक्ष या नव्या चिन्हासाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. त्याबद्दलचा निर्णय लवकरच लागण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत राज्यसभेच्या निवडणुका असून, त्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला नवीन नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे पवार गटाला आता या नवीन नावावर निवडणूक लढवता येणार आहे.
Sharad Pawar gets a new name for his faction: "Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar"
Yesterday, Election Commission granted Ajit Pawar the NCP name and symbol. pic.twitter.com/i2zRxkyhyz
— ANI (@ANI) February 7, 2024
(हेही वाचा: Vijay Wadettiwar : सत्ताधाऱ्यांचं पोट भरेना, आता स्वच्छतेत घोटाळा! वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा)
प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. तुम्ही निवडणूक आयोगाची जजमेंट वाचली तर त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की, राज्यसभेची निवडणूक तोंडावर असल्यामुळे आणि 8 तारखेपासून नोटीफिकेशन आहे, म्हणून त्यांनी वन टाइन हे नाव दिलं आहे. हे तात्पुरतं आहे. त्यांना 27 तारखेनंतर पुन्हा अर्ज करून नवं नाव आणि चिन्हं मागावं लागणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
पक्ष कार्यालय आणि पक्ष निधीवर दावा नाही
निवडणूक आयोगाने अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निकाल दिल्यानंतर राष्ट्रवादीचे मुंबईतील प्रदेश कार्यालय तसेच पक्ष निधीबाबत अजित पवार काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पक्षाचे बॅलर्ड इस्टेट येथील प्रदेश कार्यालय तसेच पक्षाच्या निधीवर अजित पवार गट दावा सांगणार नाही. त्यामुळे हे पक्ष कार्यालय आणि पक्षाचा निधी शरद पवार गटाकडेच राहणार असून त्यावरून भविष्यात वाद होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आयोगाच्या निकालानंतर प्रथमच पक्ष कार्यालयात आलेल्या अजित पवार यांचे आज जंगी स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे मंत्रालयासमोरील कार्यालय फुलांच्या माळांनी सजवण्यात आले होते. अजित पवारांचे आगमन झाले तेव्हा फटाक्यांची आतषबाजी करत आणि ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पेढे वाटून निवडणूक आयोगाच्या निकालाचे स्वागत करत आनंद व्यक्त करण्यात आला. तर शरद पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक अजित पवार गटाला दिल्याच्या निषेधार्थ निदर्शने केली.