राज ठाकरेंच्या सभेसाठी चक्क राष्ट्रवादीचे आमंत्रण

उत्तर महाराष्ट्रात सभा घेण्यासाठी उपरोधिक पत्र पाठवून नव्या वादाला तोंड

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थ येथे सभा घेतली. त्यावर राज्यासह देशभरात मोठा वादंग निर्माण झाला. राज ठाकरेंनी मांडलेल्या भोंग्याच्या मुद्द्यामुळे त्यांच्यावर विरोधी पक्ष भाजपकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला तर, दुसरीकडे महाविकास आघाडीकडून जोरदार विरोधाला सामना करावा लागला.

त्या सभेनंतर निर्माण झालेल्या वादंगानंतर त्यांनी मंगळवारी (दि.१२एप्रिल) ठाण्यात उत्तर सभेचे आयोजन केले आहे.
दरम्यान राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विद्यासागर घुगे यांनी राज ठाकरे यांना पत्र पाठवून उत्तर महाराष्ट्रात सभा घेण्याचा आग्रह केला आहे.

घुगे यांनी उपहासात्मक पद्धतीने राज ठाकरे यांच्या सभा, वक्तव्य, नक्कल यांची खिल्ली उडवणारे उपरोधिक पत्र पाठवून नव्या वादाला तोंड फोडले आहे. आता यावर नाशिकमधील आणि एकूणच मनसे कसा प्रतिसाद देणार हे बघणेही औत्सुक्याचे असेल.

काय आहे पत्रात…

महोदय, गुढीपाडव्यानिमित्त आपण घेतलेली सभा व त्यानंतर दिनांक १२/०४/२०२२ रोजी घेणार असलेली उत्तर सभा बघता उत्तर महाराष्ट्रावर अन्याय होत असल्यासारखे वाटत आहे. गेली दोन वर्षे लॉकडाऊनमुळे सर्व लोक कंटाळलेले आहेत व आता उन्हामुळे त्रस्त झालेले आहेत. आपण उत्तर महाराष्ट्रातदेखील सभा घेऊन या सर्व लोकांचे आपल्या उत्कृष्ट अशा स्टॅन्डअप कॉमेडीने मनोरंजन करून सर्वांना हसवावे, ही विनंती. आपण करत असलेल्या नकलांनी भारावलेला – विद्यासागर घुगे