उगाच देवाची कृपा…म्हणून पलटन वाढवू नका; अजित पवारांच्या सल्ल्याने हास्यकल्लोळ

ncp leader ajit pawar on two child norm baramati

उगाच देवाची कृपा…देवाची कृपा… असं म्हणून पलटण वाढवू नका, असा खोचक सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोडप्प्यांना दिला आहे. त्यांचा हा सल्ला ऐकून उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ पाहायला मिळाला. अजित पवार शनिवारी बारामतीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

या कार्यक्रमात अजित पवार यांच्या हस्ते बारामतीमधील गरजू महिलांना स्वेटर, साडी आणि शिलाई मशीनचं वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थितीतांना अजित पवारांनी संबोधित करत आवाहन केले की, आपल्या सूनबाईला आणि मुलीला केवळ दोन मुलांवरचं थांबायला सांगा, दोन मुली झाल्या तरी तिसरे अपत्य ठेवू नका, दोन्ही मुली झाल्या तरी सोन्यासारख्याचं आहेत. पोरंगाच झाला पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे हा हट्ट धरू नका, असही पवार म्हणाले.

यावर पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, मुलगी देखील कर्तबगार असते, शरद पवार साहेब एकट्या सुप्रियावर थांबले, आज सुप्रिया शरद पवार साहेबांचच नाव घेते. छोटे कुटुंब, सुखी कुटुंब असते. तुम्हालाही सर्व सुविधा मिळतील, नाही तर उगी पलटन चालूच आहे…चालूच आहे… देवाची कृपा, देवाची कृपा…म्हणे देव वरनं देतोय…आम्हाला कळना व्हयं कुणाची कृपा आहे ती. गंमतीचा भाग जाऊ द्या. पण कुटुंब मर्यादित ठेवण्याची गोष्ट लक्षात घ्या, असही पवार म्हणाले.

यावेळी बोलताना अजित पवार असंही म्हणाले की, स्वच्छतेलाही महत्त्व द्या. झाडे लावा, झाडे तोडू नका, पाने तोडू नका, रस्त्याच्या कडेने मला चांगल्या दर्जाचीच खेळणी हवी, स्वच्छता जशी घरात ठेवता तशी शहरातही ठेवली पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.


नाशिक पदवीधरसाठी भाजपचा तांबेंना की शुभांगी पाटलांना पाठिंबा?; बावनकुळे म्हणाले…