शिवसेनेत बंडखोरी होणार हे उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना सांगितलं होतं; अजित पवारांच मोठं विधान

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आज शिवसेनेतील बंडखोरीबाबत मोठं विधान केलं आहे. शिवसेनेतील बंडखोरीबाबत दोन तीन वेळा माझ्या कानावर आल्यानंतर उद्धव ठाकरेंना सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी पण त्या आमदारांना बोलवलं चर्चा केली, शरद पवार, जयंत पाटील यांनी सांगितलं होतं, ते त्यांच्यापरीने काम करत होते परंतु दुर्दैवाने त्यात यश आलं नाही. पण त्यावेळी उद्धव ठाकरेंना वाटलं नव्हत की, आपले सहकारी अशी टोकाची भूमिका घेतील, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला आहे.

अजित पवार यांनी काल एका वृत्तसंस्थेच्या कार्यक्रमात शिवसेनेतील बंडखोरीबाबत मोठं विधान केल होतं. त्यावर आज अजित पवारांनी पुन्हा भाष्य केलं. अजित पवार म्हणाले की, जे मला बोलायचं किंवा सांगायचं असत ते मी स्पष्टपणे लोकांपुढे ठेवतो. मला माहिती पण नव्हतं की, संपादक संजय राऊत पुढे काय कार्यक्रम घेणार आहेत. परंतु त्यांनी अचानक सांगितलं. मला जे खरं वाटलं माझ्या सद्सदविवेक बुद्धीला स्मरून जे खरं वाटलं, माझं मन जे सांगत होतं ते सांगण्याचा प्रयत्न केला.

आता ज्या त्या राजकीय पक्षाच्या लोकांनी मतदारांच्या मनामध्ये ही भावना वाढीला का लागली याचा विचार करावा. उलट महाविकास आघाडीने इतक्या व्यवस्थितपणे ही आघाडी टीकवण्यासाठी, मजबूत करण्यासाठी, त्याला कुठेही अडचण येणार नाही, याची खबरदारी वरिष्ठांनी घेतली पाहिजे.

सेटची परीक्षा वेगळी आणि हे सेट केलेलं वेगळं 

यावेळी अजित पवार यांनी पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनवरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला आहे. अजित पवार म्हणाले की, काही लोकं राजकारणात काम करत असताना जाहिरातबाजी, नौटंकी करण्याचा प्रयत्न करतात. काहीजण तिथे जातात बरोबर त्याच दिवशी कॅबिनेट बैठक असते. त्याचदिवशी फोन लावल्या लावल्या लागतो आणि लगेच संभाषण होतं आणि लगेच तिथून प्रतिसाद दिला जातो की ते काम आम्ही करू…. एमपीएस या स्वायत्त संस्था आहेत त्यांना आपण विनंती करु शकतो त्यांच्यावर दबाव टाकू शकत नाही. आम्ही देखील कधी कधी कुणाला फोन करतो तर आमचा सकाळी लावलेला फोन संध्याकाळी लागतो. आम्ही कधी फोन केला आणि तो कधी उचलला असं झालं नाही. सेटची परीक्षा वेगळी आणि हे सेट केलेलं वेगळं. सरकार बघून आंदोलनं केल जातं, म्हणत अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांवर निशाणा साधला आहे.


मराठा उमेदवारांना मोठा धक्का; सरकारी नोकरी भरतीत EWS आरक्षणाची संधी नाहीच