राज्यपालांना तीन वर्षांनंतरही महाराष्ट्र कळत नसेल तर…; अजित पवार संतापले

ajit pawar

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेसह अनेक संघटनांनी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यातच आता महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील राज्यपालांना तीन वर्षांहून अधिक काळ पदावर असून महाराष्ट्र कळला नसेल तर पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करावा अशी भूमिका मांडली आहे.

अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर राज्यपालांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.

राज्यपालांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधान महोदयांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे. असं म्हणत राज्यपालांना सद्‌बुद्धी लाभो, ही प्रार्थना अजित पवारांनी केली आहे.

19 नोव्हेंबरला औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवी प्रदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यावेळी कोश्यारी यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळच्या भाषणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी, शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. राज्यपालांच्या या विधानाचे पडसाद महाराष्ट्रभर पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षांपासून ते अनेत संघटनांपर्यंत रस्त्यावर उतरून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यानंतर आता अजित पवारांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली.


कोपरी पुलाच्या कामासाठी मुलुंड- ठाणे रेल्वे मार्गावरही ‘या’ वेळेत असेल पॉवर ब्लॉक