….म्हणून सत्यजित तांबेंनी काँग्रेसबरोबर जावं; अजित पवारांनी दिला सल्ला

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव करत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. यानंतर त्यांना अनेक पदवीधर आणि शिक्षक संघटनांचा पाठिंबाही मिळाला होता. यानंतर गुरुवारी लागलेल्या निकालांमध्ये सत्यजीत तांबे यांना मोठा विजय मिळाला आहे. यामुळे सत्यजीत तांबे यांची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल? यावर राजकीय चर्चा रंगत आहेत. अशात त्यांना भाजपाने सोबत येण्याची ऑफर दिली असताना काँग्रेसने अद्याप पक्षाचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद केलेले नाहीत. त्यामुळे सत्यजीत तांबे यांची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल यावरून चर्चा रंगत आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोक्षी पक्षनेते अजित पवार यांनी सत्यजीत तांबेंना एक सल्ला दिला आहे.

अजित पवार म्हणाले की,  इतके दिवस चेंडू काँग्रेसच्या कोर्टात होता. सत्यजीत निवडून आल्यानंतर काँग्रेस, भाजपा त्यांच्या त्यांच्या पक्षाकडे त्याला बोलवायचा प्रयत्न करणार. उद्या सत्यजीतला पुढे त्याचं राजकीय भवितव्य आहे. त्याला बरीच वर्षं राज्याच्या राजकारणात काम करायचंय. या सगळ्याचा विचार करून, हे माझं मत आहे, ते सत्यजीतने ऐकावं की न ऐकावं, हे त्याचं मत आहे.

परंतु त्याचं घराणं काँग्रेसच्या विचारधारेशी निगडित असल्यामुळे आणि तोही काँग्रेसच्या एका महत्त्वाच्या सेलचा प्रमुख म्हणून त्याने अनेक वर्षे तरुणांना एकत्र करण्याच कामं केलं. मधल्या दीड महिन्यात काय झालं हे त्यानं जास्त मनाला लावून घेऊ नये. त्याने काँग्रेसच्या बरोबर जावं, बाळासाहेब थोरात, आणि त्यांचे वडील सुधीर तांबे हे काय सांगतात त्यांनी ऐकावं, कारण वडीलधाऱ्यांचं आपण ऐकतो. याउपर काय करायचं हा सर्वस्वी त्याचा अधिकार आहे. त्या मतदारसंघात त्याला एवढी मतं मिळाल्यामुळे महाविकास आघाडीतील इतरांनीही त्याला मदत केलेली दिसते. त्याचे निवडणुकीचे आडाखे आणि मविआतल्या लोकांनी, मतदारांनी त्याला दिलेली साथ यामुळेच एवढं दैदिप्यमान यश मिळालं आहे, असही अजित पवार म्हणाले.


मराठा उमेदवारांना मोठा धक्का; सरकारी नोकरी भरतीत EWS आरक्षणाची संधी नाहीच