एकनाथ खडसेंची पुन्हा ‘कमळा’ला साथ? अमित शाहांशी फोनवर चर्चा, म्हणाले…

ncp leader eknath khadse first reaction on amit shahs meeting and bjp entry

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि स्नुषा व भाजप खासदार रक्षा खडसे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय. यावरून एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या कमळाला साथ घेणार अशीही शक्यता वर्तवली जात आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सर्वप्रथम केंद्रीय मंत्री अमित शहा आणि एकनाथ खडसे यांच्या भेटीवर भाष्य केले होते. ज्यावरून राजकीय वर्तुळात एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चां रंगत आहेत. या सर्व चर्चांवर आता एकनाथ खडसे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आहेत तर त्यांची स्नुषा रक्षा खडसे या मात्र भाजपच्या खासदार आहेत. दरम्यान आता सुरु असलेल्या राजकीय चर्चांवर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, एका घरात दोन पदं आहेत, हे काही फक्त माझ्याबाबतीत नाही, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांच्याही घरात दोन पदं आहेत. राजकारण ज्याच्यात निवडून येण्याची क्षमता आहे त्यांनाच लोक साथ देतात आणि ज्यांच्यात नाही त्यांना पराभूत करतात. अशा शब्दात खडसेंनी विरोधकांना सुनावले आहे. ज्या पक्षाने कठीण काळात मला साथ दिली, त्या पक्षाला मी कधीही सोडणार नसल्याचे देखील खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतील जाहीर सभेत एकनाथ खडसे यांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतल्याचा दावा केला होता, तसेच गुरुवारी जळगावच्या पत्रकार परिषदेतही खडसे- अमित शहा भेटीचा पुनरुच्चार केला. आमदार चंद्रकात पाटील यांच्या या वक्तव्यामुळे एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगतेय. यात एकनाथ खडसे यांनीही अमित शहांसोबत भेट झाल्याचे मान्य केले होते. दरम्यान खडसेंनी आपले अनेक वर्षांपासून अमित शहांसह भाजप नेत्यांसोबत जवळचे संबंध असल्याचे म्हटले होते. शिवाय शहा देशाचे गृहमंत्री असल्याने त्यांनी भेटत राहणार असल्याचेही खडसेंनी म्हटले.

अमित शहांसोबत केवळ फोनवर चर्चा – रक्षा खडसे

खासदार रक्षा खडसे यांनीही एकनाथ खडसे आम्ही अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेल्याचे मान्य केले. यावर रक्षा खडसे म्हणाल्या की, अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले, मात्र व्यस्त कामामुळे त्यांच्यासोबत भेट होऊ शकली नाही. केवळ फोनवर चर्चा झाली, मात्र विरोधक त्यांच्या परिने राजकारण करत वेगळे अर्थ लावत आहे, या व्यतिरिक्त खडसे भाजपामध्ये येणार का? याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही. ते राष्ट्रवादीत आहेत, तर मी भाजपमध्ये असल्याचं सांगत त्यांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.


वेदांत- फॉक्सकॉन गुजरातला गेल्याने आदित्य ठाकरे आक्रमक; आज तळेगावात ‘जनआक्रोश आंदोलन’