केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून नामोहरम करण्याचा प्रयत्न; जयंत पाटलांचं टीकास्त्र

ncp leader jayant patil slams ed bjp shinde fadanvis govt over hasan mushrif ed raid

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील घरावर आणि संपत्तीवर ईडीने छापेमारी केली. मुश्रीफ घरी नसताना टाकण्यात आलेल्या छापेमारीमुळे कागल आणि कोल्हापूरमधील त्यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. सध्या कोल्हापूरातील कागलमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी वाढतेय. यात आक्रमक कार्यकर्त्यांनी उद्या कागल बंदची घोषणा दिली आहे. मात्र मुश्रीफांनी समर्थकांना शांत राहण्याचे आवाहन करत कागल बंद करण्याची घोषणा मागे घेण्यास सांगितलं आहे. दरम्यान मुश्रीफांवरील कारवाईवर आता विरोधकांही टीका केली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील कारवाईवरून सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

विरोधी पक्षात जे ठामपणे उभे राहतात आणि सरकारला विरोध करतात त्यांच्याविरोधात सर्व यंत्रणांचा गैरवापर करून त्यांना बदनाम व नामोहरम करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर ईडीचे छापे पडल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

हसन मुश्रीफ यांच्या घरावर याअगोदरही आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या मात्र त्यामध्ये काहीच सापडले नाही परंतु आता ईडीने धाड टाकली आहे असे समजते असेही जयंत पाटील म्हणाले.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ही कारवाई ज्याप्रकारे होत आहे, ती राग येण्यासारखी गोष्ट आहे. काहीच केले नसतानाही वारंवार केंद्रीय यंत्रणांचा वापर कुणीतरी मुद्दामहून करत आहे, असाच त्याचा अर्थ होतो. याची जाणीव झाल्यामुळे कार्यकर्त्यांना राग अनावर झाला आहे.

यातून सत्तेत बसलेल्या लोकांना राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल प्रचंड राग असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीच आपल्याला आवाहन देऊ शकते, अशी भावना त्यांच्या मनात दिसतेय. कारण राष्ट्रवादीच्या एकामागोमाग एक नेत्यांना ऐनकेन प्रकारे अडकविण्याचा प्रयत्न दिसतोय. यासाठी यंत्रणांचा वापर सुरु आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.


आता धर्म आठवला का? हसन मियाँचं काऊंटडाऊन सुरू; किरीट सोमय्यांचा घणाघात