जनमताचा कौल सध्या सत्ताधाऱ्यांविरोधात; राष्ट्रवादीला मोठी संधी जयंत पाटलांचा दावा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मराठवाडा दौर्‍यावर, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यांचा घेतला आढावा

औरंगाबाद – अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील हे पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी मराठवाडा विभागाच्या दौर्‍यावर असून त्यांनी अहमदनगर व औरंगाबाद येथे शहर व ग्रामीण संघटनेचा आढावा घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी जनमताचा कौल सध्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असल्याचे म्हणत महाराष्ट्रात ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार पाडलं गेलं ते लोकांना पटलेले नाही. शिंदे गटाने केलेली गद्दारी ही लोकांना रुचलेली नाही. हे सरकार आल्यापासून महाराष्ट्राच्या अधोगतीचे निर्णय घेतले जात आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.

मुख्यमंत्री शिंदे दिल्लीश्वरांच्या इच्छेपुढे नमले

नुकताच सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या हातातून हिसकावून घेतला गेला. फॉक्सकॉन’चा प्रोजेक्ट जर महाराष्ट्रात आला असता तर इतर कंपन्यांनीही प्रोत्साहित होऊन त्यांचे प्रोजेक्ट आपल्या राज्यात आणण्यासाठी इच्छा व्यक्त केली असती. परंतु मुख्यमंत्री हे दिल्लीश्वरांच्या इच्छेपुढे नमले असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

अहमदनगर जिल्ह्याने नेहमीच राष्ट्रवादी विचारांना साथ दिली आहे. नगर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आपल्याला हा बालेकिल्ला अबाधित ठेवायचा असेल तर सामान्यातील सामान्य घटकाला पक्षात समाविष्ट करून घेतले पाहिजे. अहमदनगर जिल्ह्यातून आपल्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतील याबाबत जयंतराव पाटील यांनी विश्वास व्यक्त केला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांकडून पक्ष वाढीसंदर्भात त्यांच्या संकल्पना जाणून घेतल्या. मागील काळात आपल्या या जिल्ह्यांनी मोठ्या प्रमाणावर पवारसाहेबांना ताकद दिली होती याची आठवणही जयंतराव पाटील यांनी करून दिली. आपल्याला आपला पक्ष वाढवायचा असेल तर पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने तळागाळात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. शहरातील वॉर्डा – वॉर्डात बुथ लावुन नोंदणी अभियान राबविले पाहिजे असे आवाहनही जयंतराव पाटील यांनी केले.

यावेळी खासदार फौजिया खान, माजी मंत्री राजेश टोपे आमदार सतिश चव्हाण, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, निरीक्षक अमरसिंह पंडित, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा सैफ्फुद्दीन, अभिषेक देशमुख, रंगनाथ काळे, युवती जिल्हाध्यक्ष अंकिता विधाते, युवक अध्यक्ष मयुर सोनावणे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा होणार; अरविंद सावंत यांचा निर्धार