घरठाणेप्रबोधनकारांचा वारसा सांभाळा; जातीयवाद कोण करतोय, इतिहास पडताळा : जितेंद्र आव्हाड

प्रबोधनकारांचा वारसा सांभाळा; जातीयवाद कोण करतोय, इतिहास पडताळा : जितेंद्र आव्हाड

Subscribe

ठाण्यात झालेल्या मनसेच्या उत्तर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला. मात्र त्यांच्या या भाषणानंतर गृहनिर्माण आणि अल्पसंख्यांक मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.

ठाण्यात झालेल्या मनसेच्या उत्तर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला. मात्र त्यांच्या या भाषणानंतर गृहनिर्माण आणि अल्पसंख्यांक मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. “तुकाराम महाराजांनी सांगितले आहे की, जशास तसे उत्तर द्या, आज हे लक्षात ठेवा राज हे जसे बोलतील तसेच उत्तर दिले जाईल. काल राज यांची उत्तरसभा नव्हती. तर उत्तरपुजा होती. ज्याची प्रतिष्ठापना केली जाते त्याचीच उत्तरपुजेनंतर विसर्जन केले जाते” अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

“राज ठाकरे हे जेव्हा मंचावर येतात, तेव्हा ते विश्वविजेते असल्याच्या अविर्भावात माईकचा ताबा घेतात. पण त्यांनी कधी छत्रपती शिवाजी महाराज किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालताना आपण कधी पाहिले आहे का? मंचावरील महापुरुषांना यांनी कधी एकत्रित वंदन केले आहे का? असे प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केले. तसंच, “जिथे राज ठाकरे यांचे सभास्थळ होते. तिथे जवळच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता. तिथे जावेसे वाटले नाही. महाराजांना पुष्पमालिका अर्पण करावी. स्वत:ला वारसदार समजता ना? 10 मिनिटावरच डॉ. बाबासाहेबांचा पुतळा आहे. तिथे जाऊन बाबासाहेबांना मानाचा जयभीम करुन वंदन करावेसे त्यांना वाटले नाही? हे कधीच राज ठाकरेंकडून कधीच घडत नाही. पण, दुसर्‍यावर नेहमीच बोट दाखवता. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितले आहे की, जशास तसे उत्तर द्या; आज हे लक्षात ठेवा राज हे जसे बोलतील तसेच उत्तर दिले जाईल. काल राज यांची उत्तरसभा नव्हती. तर उत्तरपुजा होती. ज्याची प्रतिष्ठापना केली जाते त्याचीच उत्तरपुजेनंतर विसर्जन केले जाते”, अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

- Advertisement -

“उद्या (दि. 14) डॉ. बाबासाहेबांची जयंती आहे. गुढीपाडव्याला राज ठाकरे यांनी खूप वेळा बाबासाहेबांचे नाव घेतले आणि मिरवणुका जोरात काढा, असं सांगितलं. पण, मंगळवारच्या भाषणात बाबासाहेबांच्या लेकरांना जयंतीच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या नाहीत. शरद पवारसाहेबांनी जातीयवाद वाढविला असे राज ठाकरे म्हणाले. पण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला कोणी विरोध केला होता; छत्रपती शिवाजी महाराजांनी आईला सती न जाऊ देता कर्मकांड नाकारले, हे राज ठाकरे यांना माहित नाही. कारण, दुर्देवानं राज ठाकरे हे फक्त पुरंदरे वाचत आहेत. त्यामुळं त्यांना खरा इतिहास त्यांना माहित नाही.”

“अफझल खानाचा कोथळा काढला, त्यावेळी त्याच्या वकिलानं महाराजांवर तलवार चालविली. तो वार करणार्‍या वकिलाचं नाव होते, कृष्णा भास्कर कुलकर्णी. शिवरायांनी त्याचे मुंडके उडविले. त्यानंतर मावळ्यांनी ते तलवारीवर घेतले अन् नाचत-नाचत गडाच्या खाली उतरले. त्यानंतर जिजाऊंच्या आदेशानुसार शिवरायांनी अफझल खानाची कबर छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधली. पण, शिवरायांनी कृष्णा कुलकर्णीची समाधी नाही बनवली. तर, शिवरायांच्या मावळ्यांनी ते मुंडके लाथाडून-लाथाडून जंगलाच्या बाहेर फेकले, हा खरा इतिहास सांगण्याची हिमंत राज ठाकरे यांनी दाखवावी. त्याच्या नंतरच्या इतिहासात काय झाले, जिंकले तर पेशवे आणि हरले तर मराठे, हा जातीयवाद कोणी निर्माण केला? हिडीस-पीडीस बोलत असताना तुम्हाला इंधनाचे, जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले भाव दिसत नाहीत? त्याच्यावर काहीच बोलणार नाहीत. राज ठाकरे हे एवढे भोंग्यांबद्दल बोलत आहेत, मग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जिथे सभा घेतली, तिथे सायलेन्स झोन आहे. सभेच्या एका बाजूला सेंट जॉन स्कूल आणि दुसर्‍या बाजूला शिवसमर्थ विद्यालय आहे आणि मागे दगडी शाळा आहे.”

- Advertisement -

“राज यांनी वस्तरा कसा सापडेल, मुस्लीम दाढीच करीत नाहीत, असे विधान केले. पण, राज ठाकरे हे विसरले की, हाजी आराफत शेख हे हे पूर्वी मनसेच्या वाहतूक सेनेचे अध्यक्ष होते. ते राज ठाकरे यांचे मित्र होते. त्यांच्या मांडीला मांडी लावून राज यांनी जेवण केले आहे. ते नेहमीच साफ दाढीचे होते. मुंब्य्रात अतिरेकी सापडले, असे राज यांनी सांगितले. पण, आपण सन 2009 पासून मुंब्य्राचे प्रतिनिधीत्व करीत आहोत. पण, केवळ दोन वेळा तिथे अतिरेक्यांच्या रेकॉर्डवरील लोक सापडले; पण, तेदेखील बाहेरुन आलेले भाडेकरु होते. ते स्थानिक नव्हते. मुंब्य्रात आता एवढा बदल झाला आहे की, मुंब्य्रात आता लोक वेगळा विचार करीतच नाहीत. मुंब्रा येथे जे दहशतवादी सापडले आहेत. अतिरेकी हा जातीधर्माचा नसतो. राज ठाकरे हे कधी साध्वीवर बोलताना दिसले नाहीत. नथुराम हा देशातील पहिला अतिरेकी होता, त्याच्यावर राज कधी बोलत नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांनी बोलताना इतिहास पडताळून घ्यावा; कोण मुस्लीम देशप्रेमी आहे आणि कोण देशद्रोही, याचे सर्टीफिकेट राज ठाकरे हे देणार का?, तुम्ही इतरांच्या चेहर्‍यावर, नाकावर, रंगावर भाष्य करता; तुमच्यामध्ये वर्णद्वेष आणि जातीयवाद किती ठासून भरलाय, हे तुम्हीच दाखवून देताय. आता जर आम्ही म्हटले की तुम्ही किती ढेरपोटे झालात. तुमचा चेहरा किती सुजलाय, तर तुम्हाला ते आवडेल का? राजकारणामध्ये वर्णद्वेष, शारीरीक व्यंगावर बोलणे हे पाप आहे.”

“इथे मतभेद होऊ शकतात; पण, मनभेद होऊ शकत नाहीत. राज ठाकरे यांनी माझी अक्कल काढली. राज हे खूप हुशार आहेत. पण, त्यांच्या आजोबांनी प्रतापसिंह राजे यांच्यावर लिहिलेले पुस्तक राज यांनी वाचावे. सातारच्या गादीच्या वारसांना पेशव्यांनी कसे कोंडून ठेवले होते अन् त्यांची आई ही प्रतापसिंह राजांना पहाटे कशी शिकवायची, हे प्रबोधनकारांनीच लिहून ठेवले आहे. राज यांनी म्हटले की, शरद पवार हे फक्त शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेतात. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी महात्मा फुले यांनीच शोधून काढली.”

“राज ठाकरे हे ज्या प्रबोधनकार, बाळासाहेबांच्या पुण्याईवर राज मार्गक्रमण करीत आहेत; म्हणूनच लोक राज ठाकरे यांचे भाषण ऐकत आहेत. संत तुकारामांनी जशास तसे उत्तर देण्याचे शिकवले आहे. गरगर फिरवण्याची भाषा राज ठाकरे यांनी केली. पण, आता मात्र बस्स झाले; आम्ही तुकोबाराय आणि शिवरायांचे वारसदार आहोत; अन् संत तुकारामच सांगून गेले आहेत की, ”भले तर देऊ कासेची लंगोटी; नाठाळाचे माथी हाणू काठी!” त्यामुळं आम्हीही तसेच उत्तर देऊ”, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.


हेही वाचा – Jayshree Patil : गुन्हा दाखल झाल्यानंतर जयश्री पाटील फरार, एसटी कर्मचाऱ्यांचे ८० लाख रुपये घेतल्याचा आरोप

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -