…त्यांनी मुंबईकरांची माफी मागावी; डान्सबारची उपमा देणाऱ्या राज ठाकरेंविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

सुशोभीकरणाच्या नावाखाली काय केलंय काही कळत नाही. मुंबईत खांबावर लाईट लावले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी मुंबई आहे की डान्सबार कळत नाही, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. त्यामुळे मुंबईला डान्सबारची उपमा देणाऱ्या राज ठाकरेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यांनी मुंबईकरांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुंबईत विद्युत खांबावर लावण्यात आलेली रोषणाई राज ठाकरे यांना डान्सबारसारखी दिसत असेल तर ही शोकांतिका आहे. मुंबईकरांचा अपमान करणार्‍या राज ठाकरे यांनी जनतेची व मुंबईकरांची माफी मागावी, अशी मागणी महेश तपासे यांनी यावेळी केली.

मुंबई डान्सबारसारखी दिसते असं म्हणणाऱ्या राज ठाकरे यांना बेस्टनं १८ टक्के वीज दरवाढीसाठी दिलेला प्रस्ताव दिसत नाही किंवा ते त्यावर बोलत नाहीत. त्यावर बोलले असते तर नक्कीच आनंद झाला असता, असं महेश तपासे म्हणाले.

दरम्यान, महेश तपासे यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असून राज ठाकरे काय भूमिका मांडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : सुशोभीकरणाच्या नावाखाली काय केलंय?, संध्याकाळी मुंबई आहे की डान्सबार.., राज ठाकरेंनी उपस्थित केला प्रश्न