भाजप नेत्यांनी पोरखेळ लावलाय तो बंद करावा, अन्यथा..,राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

Mohit Kamboj

भाजप नेते मोहित कंबोज यांच्या एका ट्विटमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकर नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना भेटणार, असल्याचं ट्विट कंबोज यांनी केलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, भाजप नेत्यांनी पोरखेळ लावलाय तो बंद करावा, अशा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी दिला आहे.

रुपाली पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, दरवेळी कोणतरी नेता उठतो आणि म्हणतो, हा नेता आत जाणार आणि याच्यावर कारवाई होणार, याला कोणताही कायदेशीर थारा नाही. भाजपच्या नेत्यांकडून ईडी, सीबीआयचा गैरवापर करून ज्याला क्लिनचीट दिली असेल, तुमच्या काळात दिली गेली असेल तरी पुन्हा चौकशी करायला लावणे हा पोरखेळ आहे. हा पोरखेळ तुम्ही थांबवणार आहात का?, असा सवाल रुपाली पाटील यांनी उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला आहे.

विरोधकांवर खोटे आरोप करायचे. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर असे ट्विट सोडून विरोधकांना धाकात ठेवायचे. असा जो प्रकार मोहित कंबोज करत आहेत, त्याला आमचा ठाम विरोध आहे, असं पाटील म्हणाल्या.

कंबोज हा फक्त भाजपाचा भोंगा – अमोल मिटकरी

मोहीत कंबोज हा फक्त भाजपाचा भोंगा आहे. त्याला दुसरे काही जमत नसून, तो फक्त एक आभास निर्माण करतोय, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

राज्यातील मागील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे तरुंगात आहेत. त्यानंतर आता आणखी एक राष्ट्रवादीचा नेता लवकरच तरुंगात जाणार असल्याचे भाजपा नेते मोहित कंबोज यांनी सांगितले आहे. कंबोज यांच्या या ट्विटनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.


हेही वाचा : नेत्यांना मणका असतो, ते उद्धव ठाकरेंकडे पाहून कळाले, नाहीतर… आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर