घरताज्या घडामोडीRaj Thackerayच्या टीकेवर शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, 'एखादं व्याख्यान देऊन पुन्हा ३-४...

Raj Thackerayच्या टीकेवर शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘एखादं व्याख्यान देऊन पुन्हा ३-४ महिने गायब’

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल, शनिवारी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या टीका केली. शरद पवारांनी महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण आणले, असे राज ठाकरे म्हणाले. यावर आज शरद पवारांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार म्हणाले की, ‘सर्व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे नेण्याची राष्ट्रवादीची भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गेल्या काही वर्षातला इतिहास राज ठाकरेंनी तपासावा. राज ठाकरे ३-४ महिने भूमिगत होतात आणि एखादं व्याख्यान देऊन पुढचे ३-४ महिने काय करतात मला माहित नाही.’

नक्की काय म्हणाले शरद पवार? 

राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर बोलत असताना शरद पवार म्हणाले की, ‘चांगली गोष्ट आहे. बरेच महिने ते कुठे भूमिगत झाले होते, याचा काही अंदाज आमच्या कोणाला येत नाही. राज ठाकरेंच हे वैशिष्ट आहे की, ३-४ महिने कुठेतरी भूमिगत होतात आणि एखादं व्याख्यान देऊन पुन्हा पुढचे ३-४ महिने काय करतात मला माहित नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गेल्या ५-६ वर्षातील त्यांनी उल्लेख केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व राज्यात कोण कोण करत होतं? महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत पहिल्यांदा छगन भुजबळ नेते होते. त्याच्यानंतर मधुकरराव पिचड हे आदिवासी नेते होते. छगन भुजबळ कोणत्या समाजाचे आहेत हे सगळ्यांच ठाऊक आहे. अशी सर्वांची जर यादी बघितली, तर यावेळेला पहिल्यांदा अजित पवारांची निवड झाली आणि त्याचं कारण, सभासदांनी असं सांगितलं की, त्यांना विधीमंडळात येऊन ३० वर्षे झाली आणि ३० वर्षे एखादी व्यक्ती त्या ठिकाणी काम करत असताना त्यांना संधी द्यावी. त्यामुळे त्यांची निवड झाली. सर्व जाती-जमातीच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे नेण्याची राष्ट्रवादीची भूमिका आहे.’

- Advertisement -

‘राज ठाकरेंना उत्तर प्रदेशामधील कौतुकास्पद काय दिसलं मला माहित नाही. अलीकडच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये काय-काय घडलं. निवडणुकाचा निकाल वेगळा लागला त्याची कारणं दुसरी आहेत. पण ज्या ठिकाणी लखीमपूरला शेतकऱ्यांची हत्या झाली. तसेच त्या ठिकाणी उत्तर प्रदेशच्या सीमेवर जवळपास एक वर्ष शेतकरी आंदोलनसाठी बसले होते. त्यांची समस्या दूर करायला कोणी पुढे आलं नाही. अशा किती तरी गोष्टी उत्तर प्रदेशमध्ये योगींच्या राजवटीच्या काळात घडल्या आहेत. अशा प्रकारची राजवट राज ठाकरे उत्तम आहे, असं म्हणत असतील, तर मला काही त्यावर भाष्य करायचं नाही. पण महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं सरकार असं होऊ देणार नाही,’ असे शरद पवार म्हणाले.

राज ठाकरे काय म्हणाले होते? 

लोक जातीपातीच्या मुद्यावर एकमेकांविरोधात उभे राहावेत ही गोष्ट राष्ट्रवादीला आणि शरद पवार यांना हवी आहे. महाराष्ट्रात १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासूनच जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरू झाले, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला. जातीच्या निमित्ताने महाराष्ट्रात एकमेकांची भडकवायची कामे सुरू झाली. महाराष्ट्रात एकेकाळी जातीचा अभिमान होता. पण जातीत फूट पाडायची सुरुवात ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर झाली. निवडणुकांच्या तोंडावर पैशाचा चारा टाकायचा आणि सत्ता मिळवायची असाच प्रकार सुरू झाला. आम्ही एकमेकांची डोकी फोडायला तयार झालो असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -