केंद्रीय यंत्रणांचा राजकीय हेतूने गैरवापर

शरद पवार यांचा केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा, भाजप नेत्यांनी भडकवल्याने मावळमध्ये स्थानिक आक्रमक, फडणवीसांवर टीकास्त्र

Devendra Fadnavis's reaction to Sharad Pawar's call not to visit, said I am coming

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विरोधकांना नामोहरण करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार ईडी, प्राप्तिकर कर विभाग यासारख्या यंत्रणांचा गैरवापर करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केला. लखिमपूर घटनेबाबत मी जालियनवाला बाग असा शब्द वापरल्यानंतर मला काही भाजप मंत्र्यांचे फोन आले, त्यांना वाईट वाटले. शब्द चांगले वापरले नाहीत असे ते म्हणाले. त्यानंतर घरी सरकारी पाहुणे यायला सुरुवात झाली. आज माझ्या मुलींच्या घरी सहा दिवसांपासून अठरा सरकारी पाहुणे बसले आहेत. पाहुणचार घ्यावा; पण अजीर्ण होईल इतका पाहुणचार घेऊ नये, असा टोलाही पवार यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव तसेच जवळच्या नातेवाईकांवर प्राप्तिकर विभागाने धाडी घातल्या आहेत. याशिवाय माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सातत्याने धाडी टाकल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत भाजपवर टीकास्त्र सोडले. याशिवाय जालियनवाला बाग शब्द वापरला म्हणून मावळ गोळीबाराची आठवण करून देणारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही पवार यांनी टोले लगावले.

मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी अनिल देशमुख यांच्यावर काही आरोप केले. त्यातून वातावरण निर्मिती झाली. ज्यांनी आरोप केले, ते गृहस्थ आज कुठेही दिसत नाही. एक जबाबदार अधिकारी बेछूटपणे आरोप करतो, असे कधी दिसले नव्हते. अनिल देशमुख यांनी आरोप झाल्यानंतर तात्काळ पदावरून दूर जाण्याची भूमिका घेतली. दुसर्‍या बाजूला परमबीर सिंह यांच्यावर आता आरोपांची मालिका सुरू झाली आहे. हे आरोप होत असताना ते गायब झाल्याचे दिसते, असे पवार म्हणाले.

अनिल देशमुख यांच्या घरावर काल पाचव्यांदा छापा पडल्याचे कळले. पाच-पाच वेळेला एका व्यक्तीच्या घरी छापा टाकला याचा अर्थ हा विक्रमच त्यांनी केला, असा मिश्किल टोला शरद पवार यांनी लगावला. आज माझ्या मुलींच्या घरी सहा दिवसांपासून १८ सरकारी पाहुणे बसलेले आहेत. संबंधित अधिकार्‍यांनाही घरी जायचे आहे, पण त्यांना घरातून बाहेर पडण्याच्या सूचना वरून आलेल्या नाहीत. याआधीही केंद्रीय यंत्रणांनी घरी जाऊन चौकशी केली आहे. पण इतके दिवस ठाण मांडून बसण्याची ही पहिलीच वेळ आहे. तरीही आमची याबाबत काही तक्रार नाही, असेही पवार म्हणाले.

केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून काही लोकांना बदनाम केले जात आहे. नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर काही गोष्टी मांडल्या आहेत. मीही काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या प्रदिर्घ संसदीय अनुभवामुळे प्रशासनाची मला जाण आहे. सत्तेत आणि विरोधात काम करत असताना प्रशासनाशी आमचा सुसंवाद असतो. सत्तेचा उन्माद आम्ही कधी केला नाही. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले. याआधी ते विमानतळावर कार्यरत होते, तिथल्याही काही कथा माझ्या कानावर आल्या. मात्र, त्यावर मी आताच भाष्य करू इच्छित नाही. एनसीबीने गेल्या काही वर्षात जप्त केलेला अमली पदार्थाचा साठा अतिशय कमी आहे. याउलट महाराष्ट्राच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कितीतरी अधिक पटीने अमली पदार्थ जप्त केले आहे. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा फक्त केंद्राला माहिती देण्यापुरती काही जप्तीची कारवाई करते की काय? अशी शंका शरद पवार यांनी व्यक्त केली.

मावळ घटनेची तुलना लखिमपूर हिंसाचाराशी करणार्‍या देवेंद्र फडणवीस यांना पवार यांनी यावेळी आपल्या शैलीत सुनावले. मावळची घटना आणि लखिीमपूर हिंसाचाराच्या घटनेत जराही साम्य नसल्याचे पवार म्हणाले. मावळमध्ये जे घडले किंवा शेतकरी मृत्युमुखी पडले त्यांना जबाबदार सत्ताधारी पक्षाचे नेते किंवा मंत्री जबाबदार नव्हते. त्या घटनेला जबाबदार पोलीस आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी तेथे कारवाई केली. मात्र, लखिमपूर आणि मावळची तुलना होऊ शकत नाही, असे पवार म्हणाले.

मावळ घटनेसंदर्भात त्यावेळेला ज्यांच्यावर आरोप केले त्यांचा काही संबंध नव्हता. उलट परिस्थिती हाताबाहेर जावी म्हणून भाजपने प्रोत्साहित केले आणि म्हणून मावळमध्ये संघर्ष झाला असा आरोप पवार यांनी भाजपवर केला. गोळीबाराच्या काळात लोकांना भडकवण्याचे काम कोणी केले हे लोकांच्या लक्षात आले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ९० हजारांच्या फरकाने निवडून आला. जर याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जबाबदार असता तर पक्षाचा उमेदवार निवडून आलाच नसता हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे, असे पवार म्हणाले.

फडणवीसांना ते अजूनही मुख्यमंत्री असल्याचे वाटते. चांगली गोष्ट आहे त्यांना अजूनही सत्तेत असल्यासारखे वाटते. माझा अनुभव वेगळा आहे. मुख्यमंत्री पदावर काम केल्यानंतर पुढच्यावेळी मी विरोधी पक्षात काम केले. त्यावेळी प्रशासनाने सत्तेवर असताना आपल्याला दिलेले अहवाल आणि जमिनीवरची वास्तवता वेगळी असते. विरोधात असताना लोकांमध्ये फिरल्यानंतर त्याचा अभ्यास होतो, असा टोलाही त्यांनी फडणवीस यांना लगावला.

दरम्यान, साखर कारखाने बंद करायला फारशी अक्कल लागत नाही तर सुरू करायला लागते, असा टोलाही शरद पवार यांनी यावेळी लगावला. पुढील १५ दिवसात महाराष्ट्रातील साखर कारखाने सुरू होणार आहेत. यावेळी ऊसाचे विक्रमी उत्पादन घेतले जाईल, असा अंदाज आहे. आता काही लोकांनी मागणी पुढे केली आहे की, ऊसाला एकाचवेळी एकरकमी एफआरपी दिला पाहिजे. मागणी चांगलीच आहे; पण त्यासोबत वस्तुस्थितीही पाहिली पाहिजे.

गुजरातमध्ये ऊस उत्पादकांना तीन हप्त्यात पैसे दिले जातात. महाराष्ट्रात एका कारखान्याने एकरकमी पैसे दिल्यानंतर सर्वांकडून ही मागणी सुरू झाली आणि टप्प्याटप्प्याने पैसे न देता एकरकमी एफआरपी द्या, अशी मागणी पुढे येत आहे. पण याचे अर्थकारण समजून घेतले पाहिजे. साखर कारखान्यांनी टप्प्याटप्प्याने साखर विकल्यानंतर मागणी आणि पुरवठा याचे प्रमाण टिकून राहते. मात्र, एकाच टप्प्यात सर्व साखरेचे उत्पादन काढले तर पुरवठा वाढल्यानंतर साखरेचे दर कोसळतील, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.

जर कारखान्यांनी कर्ज काढून शेतकर्‍यांना पैसे जरी दिले तर ते कर्ज कसे फेडणार? यातून कारखाने कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे. एकेकाळी मुंबईत मोठ्या प्रमाणात कापड गिरण्या होत्या. त्यावेळच्या नेत्यांनी काही अतिरेकी मागण्या केल्या. आम्ही सांगत होतो की, ताणावे पण तुटेपर्यंत ताणू नये. पण ते ऐकले नाही आणि आज मुंबईतील कापड व्यवसाय नामशेष झाला. तसा फटका साखर कारखान्यांना बसू शकतो, अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली.