दिल्लीवरून राज्य सरकारला रोज अनेक गोष्टींवरून त्रास – शरद पवार

११ ऑक्टोबरला एकही वाहन रस्त्यावर दिसता कामा नये, जालियानवाला बागेशी संबंध जोडल्याने कारवाई - शरद पवार

पवार कुटुंबियांशी संबंधित व्यक्तींवर आयकर विभागाचे छापे आणि लखीमपूर हिंसेवरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार प्रचंड आक्रमक झाले आहेत. दिल्लीवरून राज्य सरकारला रोज अनेक गोष्टींवरून त्रास दिला जात आहे. मी लखीमपूर हिंसेचा जालियनवाला बागेशी संबंध जोडला. हा उल्लेख सत्ताधार्‍यांना रुजला नाही. एका सत्ताधारी नेत्याने मला सांगितले. त्यामुळे छापेमारी करण्यात आली. लखीमपूरमध्ये शेतकर्‍यांवर झालेल्या हिंसाचाराविरोधात ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद घोषित केला आहे. त्या दिवशी एकही दुकान उघडे नसावे, रस्त्यावर एकही वाहन येता कामा नये, असे निर्देश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले.

शरद पवार शुक्रवारी सोलापुरात होते. सोलापुरात ते राष्ट्रवादीच्या पदाधिकारी मेळाव्याला संबोधित करताना पवारांनी थेट केंद्र सरकारला हिशोबच विचारला आहे. दिल्लीवरून राज्य सरकारला रोज अनेक गोष्टींवरून त्रास दिला जात आहे. केंद्र सरकार इकडून कर गोळा करते. मात्र, राज्याला त्याचा वाटा देत नाही. आज देऊ, उद्या देऊ असे करत आहेत. अतिवृष्टीचे पैसेही केंद्र सरकार देत नाही. अतिवृष्टीचे पैसे देताही आज देऊ, उद्या देऊ करत आहेत, असे पवार म्हणाले.

मी मंत्री असताना गुजरातला निधी देऊ नका, असे मला सांगितले जात होते. पण मी मात्र देश चालवण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे संकुचितपणा न ठेवता मदत केली. मी गुजरातमध्ये कोणता पक्ष सत्तेवर आहे हे पाहिले नाही. तिथल्या लोकांशी बांधिलकी ठेवली. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे, असेही पवारांनी सांगितले.

देशात शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. त्यात महाराष्ट्र कुठे आहे, असे लोक विचारतात. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांची बैठक झाली. त्यात 11 तारखेला महाराष्ट्र बंद ठेवायचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या बंदमध्ये सहभागी व्हा. एकही वाहन रस्त्यावर येता कामा नये. कायदा हातात न घेता देशाला संदेश द्यायचा आहे. केंद्र सरकारला धडा शिकवायचा आहे, असे ते म्हणाले.

यावेळी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीवरूनही त्यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. जगात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्वस्त झाल्या आहेत. तरीही इकडे किमती रोज वाढताना दिसत आहेत. या महागाईला भाजप सरकार जबाबदार आहे. त्यामुळे 11 तारखेचा बंद महत्त्वाचा आहे. सोलापूर जिल्हा हा अन्यायाविरोधात लढणारा आहे. त्यामुळे हा बंद यशस्वी करा, असे आवाहन त्यांनी केले.

पाहुणे गेल्यावर भाष्य करीन – अजित पवार
आता सध्या चौकशी सुरू आहे. आयकर विभाग त्यांचे काम करणार आहे. सध्या काम सुरू आहे. हे काम जेव्हा संपेल तेव्हा मी या संदर्भात बोलेन. आजसुद्धा हे काम सुरू आहे. आयकर विभागाला कोणत्याही कंपनीवर रेड टाकण्याचा अधिकार आहे. यामध्ये काय योग्य आहे? काय अयोग्य आहे? कॅश सापडतात का? याची ते चौकशी करतात. त्यांची चौकशी करून ते जातील. मग मी यावर भाष्य करीन. पाहुणे लोक थांबलेले आहेत. त्यांना आपल्याला डिस्टर्ब करायचे नाही. त्यांचा पाहुणचार झाल्यानंतर मी सगळं बोलेन. मी इथेच आहे. मी आर्थिक शिस्त पाळणारा आहे. मी कुठेही जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला मुलगा पार्थ पवार यांच्या कंपनीवर पडलेल्या आयकर विभागाच्या धाडी संबंधात भाष्य केले.

दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकणार नाही – सुप्रिया सुळे

छत्रपतींनी कधी महिलांना लक्ष्य केले नाही. मुघलांनी मात्र महिलांवर अत्याचार केले होते. छत्रपतींचे नाव भाषणात घेणारे दिल्लीतील नेते हे छत्रपतींच्या विचारांकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी आयकर धाडीवरून भाजपवर टीकास्त्र सोडले. दिल्लीचे तख्त असो वा केंद्र सरकार महाराष्ट्र कधी झुकलेला नाही आणि झुकणारही नाही, असेही त्यांनी बजावले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या कंपन्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली. जेव्हा आमच्या बहिणींवर आयकर विभागाने धाड टाकल्याचे समजले तेव्हा धक्का बसला. ही दुर्दैवी गोष्ट आहे. मला माझ्या बहिणींच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. तीनही बहिणी खंबीर आहेत, त्या यातून बाहेर पडतील, असेही त्या म्हणाल्या.