शरद पवारांचा वर्धा, यवतमाळ दौरा पुढे ढकलला

Praise of Sharad Pawar for State Cooperative Bank

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्याला बुधवापासून सुरुवात झाली. मात्र आता शरद पवार यांचा वर्धा, यवतमाळ जिल्ह्याचा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे समोर येत आहे. १९ आणि २० नोव्हेंबर शुक्रवार, शनिवारी शरद पवार विदर्भातील वर्धा आणि यवतमाळ येथे दौरा करणार होते. माहितीनुसार चंद्रपूर दौरा करून शरद पवार मुंबईत पुन्हा परतणार आहेत. मात्र दौरा पुढे ढकलण्यामागचे अद्याप कारण अस्पष्ट आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने ‘मिशन विदर्भ’ सुरू केले होते. या मिशन अंतर्गत शरद पवार १७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरपर्यंत विदर्भ दौरा करणार होते. दौऱ्यादरम्यान नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांचा आढावा घेणार होते. आजपासून या मिशनला नागपूर येथून सुरुवात झाली. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले आणि नागपूर दौरा व्यवस्थित रित्या पार पडला. मात्र त्यानंतर आता शरद पवार यांचा वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.

नागपूर दौऱ्यात शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार म्हणाले की, ‘गेल्या अनेक वर्षांमध्ये आजचा असा पहिला दिवस आहे की नागपूरमध्ये आलो आणि माझ्यासोबत अनिल देशमुख इथे नाहीत. हे आतापर्यंत घडले नव्हते. गेली अनेक वर्षे आपण एकत्रितपणे काम करतो. नागपूर जिल्हा, नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा या सगळ्या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनाला आणि कार्यकर्त्यांना शक्ती देण्याची जबाबदारी अत्यंत समर्थपणे अनिल देशमुखांनी सांभाळली.’

पुढे शरद पवार म्हणाले की, ‘आताचे केंद्र सरकार हे एखाद्या राज्यात सत्ता मिळाली नाही तर सत्तेचा गैरवापर करून त्या राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असते. तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक सरकार उभे करण्यात आपल्याला यश मिळाले. या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचा महत्त्वाचा सहभाग आहे. राज्याला स्थिर कारभार देऊन प्रगतीच्या मार्गाकडे न्यायचा निर्णय आम्ही घेतला. पण काही लोकांना हे पटत नाही. काहींच्या हातून सत्ता गेल्याने त्यांच्यात एक अस्वस्थता निर्माण झाली. यातूनच दिल्लीच्या मदतीने इथले राज्य कसे घालवता येईल यासाठी अखंड प्रयत्न सुरू केलेले दिसत आहेत. त्याची सुरुवात म्हणून सरकारमधील नेत्यांचा वेगवेगळ्या केंद्रीय संस्थांचा वापर करून एकप्रकारे छळवाद करण्याचे काम सुरू आहे.’

‘दोषारोप होताच अनिल देशमुख माझ्याकडे आले आणि दोष लागल्यामुळे मी सत्तेत बसणार नाही हा निर्णय घेतला आणि त्यांनी राजीनामा दिला. हे कशामुळे घडले तर एका माजी आयुक्तांमुळे घडले. आता हे आयुक्त आहेत कुठे? तुम्हाला तोंड दाखवायची ज्यांची तयारी नाही असे अधिकारी बाहेर आहेत आणि अनिल देशमुख आत आहेत. काही अस्वस्थ लोकं याद्या तयार करून दिल्लीला पाठवतात आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी करतात. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेतृत्व केले. त्यांनी पक्ष बदलल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या पत्नीला ईडीने चौकशीसाठी बोलावले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत काही करता येत नसल्यामुळे त्यांच्या पत्नीला चौकशीस बोलावले. अजित पवार त्यांच्याबद्दल काही करता येत नाही तर त्यांच्या बहिणींच्या घरी धाडीसाठी लोक पाठवले. पाच-पाच दिवस तपास झाल्यावर, त्यांना विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले की दिल्लीवरून आदेश आहेत. बातमी यायला हवी आणि बदनामी व्हायला हवी ही अपेक्षा आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरी चौकशी करतात, छापे मारतात तरीही काही निघत नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत. राज्यातील सरकार आपल्या हातून गेले म्हणून काही करता येत नाही. त्यामुळे अशाप्रकारे त्रास देणे, अटक करणे, बदनामी करणे हे काम केंद्र सरकारकडून केले जात आहे. तुम्ही कितीही छापे मारा आज ना उद्या ही सगळी शक्ती सामान्य माणसांचा पाठिंबा घेऊन कधीही तुम्हाला राज्यात सत्तेत येऊ देणार नाही,’ असे म्हणत शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला.