ऑनलाइन रम्मी खेळण्यास प्रवृत्त करणाऱ्या कलाकारांवर गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादीची मागणी

ncp leaders demanding a ban on online rummy in maharashtra

महाराष्ट्रात एखादा व्यक्ती जुगार खेळताना आढळला तर त्यावर कायदेशीर केली जाते. परंतु तरी देखील राज्यात ऑनलाईन रम्मीच्या माध्यमांतून लोकांना अधिकृतपणे जुगार खेळण्यास प्रवृत्त केलं जात आहे. यात विशेषत: सिनेसृष्टीतील अनेक कलाकार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑनलाईन रम्मीची जाहीरात करुन लोकांना रम्मी खेळण्यास अधिक प्रवृत्त करतात. त्यामुळे अशा कलाकारांविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी पत्र लिहिलं आहे.

या पत्रात त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात मटक्यासारख्या किंवा पत्ते खेळण्यास बंदी आहे. जर एखाद्या गावात किंवा एखाद्या ठिकाणी अशाप्रकारे पत्ते खेळताना आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा प्राविधान आहे. मात्र ऑनलाईन रम्मीतून सर्रास महाराष्ट्रात अवैध धंदा सुरु आहे. या धंद्याला आणखी यशस्वी करण्यात मराठी चित्रपट कलाकारांचा हात आहे. हे कलाकार जाहिरात करुन लोकांना रम्मी खेळण्यास प्रवृत्त करत आहेत. यामध्ये आघाडीवर मराठी कलाकार अंकुश चौधरी, अमेय वाघ, सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी, शिवाजी साटम, मनोज जोशी, शरद केळकर, श्रृती मराठे, उमेश कामात, संतोष जुवेकर, गौरी नलावडे आणि अमृता खानविलकर यांसारख्या कलाकारांची नावं आघाडीवर आहे. तर हिंदीतील अभिनेते ऋतिक रोशन, अन्नू कपूर, शक्ती कपूर, कुमार सानू, आलोक नाथ, रजा मुरदअनुप सोनी, मनोज वायपेय, अली अजगर, शिशिर शर्मा हे कलाकार देखील ऑनलाईन रम्मीची जाहिरात करत आहेत. दुसरीकडे मराठी आणि हिंदीमधील असे नामांकित कलाकार आहेत ज्यांनी समाजावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून दारू गुटखा अशा प्रकारच्या कुठल्याही जाहिराती नाकारल्या आहेत, ज्याने समाजातील लोकांच आरोग्य खराब होईल. अशा प्रकारच्या कलाकाराचं कौतुक आहे. मात्र जे कलाकार नुसते पैसे कमावण्याच्या उद्देशाने समाजाचं स्वस्थ बिघडवत असतील तर अशा कलाकारांवर गुन्हे दाखल करुन त्यांना शिक्षा होणं महत्त्वाच आहे. अशी मागणीही बाबासाहेब पाटील यांनी पत्रातून केली आहे.

कलाक्षेत्र आणि कलाकार हे समाजाचं प्रतिनिधीत्व करत असतात, त्यांच्या कृतीवर लोक विश्वास ठेवून तशाप्रकारे वागण्याचा किंवा अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. मराठी कलाकारांवी आपल्या परिवारातल्या आई, वडील, भाऊ, बहीण अशा लोकांना रम्मी खेळण्यास प्रोत्साहित केले असते का? असा संतप्त सवालही बाळासाहेब पाटील यांनी उपस्थित केला आहे.

त्यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी करत पत्रात पुढे म्हटले की, महाराष्ट्रातील अनेक तरुणांना आणि परिवारांना देशोधडीला लावणाऱ्या या ऑनलाईन रम्मी जुगारावर आळा घालावा अन्यथा राष्ट्रवादी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चित्रपट विभागाच्यावतीने आक्रमक भूमिका घेतली जाईल, असा इशाराच बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे.


Viral Video : प्रजासत्ताक दिनी राष्ट्रगीत गाण्यास शिक्षकाचा नकार; वाचा नेमके प्रकरण काय?