महाविकास आघाडीत धुसफूस, राष्ट्रवादीच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

अजित पवार सोडल्यास कोणीही मंत्री आमची कामं करत नाही. आता मतदान करूनसुद्धा माझी कामं झाली नाही, तर 20 जूनला विधान परिषदेची निवडणूक आहेच, असा इशाराच त्यांनी शिवसेनेला दिला आहे

mohite patil
mohite patil

मुंबईः राज्यसभेच्या 6 जागांसाठी मतदान सुरू असून, संध्याकाळपर्यंत निकाल हाती येणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या मतदानात अपक्ष आमदारांना चांगलाच भाव आला असला तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं आपापल्या मतांचा कोटा वाढवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला कोटा 42 वरून 44 आमदारांचा केला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतापल्याचीही माहिती समोर आली होती. आता राष्ट्रवादीच्याच एका आमदारानं मुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिलाय. त्यामुळे महाविकास आघाडीतही धुसफूस चव्हाट्यावर आल्याचं बोललं जातंय.

राष्ट्रवादीचे खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत नाराजी व्यक्त केलीय. मतदानाच्या पार्श्वभूमीवर दिलीप मोहिते पाटलांनी नाराजी व्यक्त केल्यानं त्यांना समजवण्यासाठी अजित पवार आणि जयंत पाटलांना पुढाकार घ्यावा लागला आहे. आता मी मतदान करतोय, पण आमची काम करा, असंही दिलीप मोहिते पाटील म्हणालेत. मुख्यमंत्री कधीही वेळ देत नसल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखवलीय.

माझ्या तालुक्यातील पंचायत समितीच्या वादाच्या वेळीसुद्धा मी शिवसेनेला मदत केली होती. त्यांना सभापतीपद दिलं. एवढी मदत करूनही शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटलांमुळे कामे अडकल्याचंही त्यांनी सांगितलं. अजित पवार सोडल्यास कोणीही मंत्री आमची कामं करत नाही. आता मतदान करूनसुद्धा माझी कामं झाली नाही, तर 20 जूनला विधान परिषदेची निवडणूक आहेच, असा इशाराच त्यांनी शिवसेनेला दिला आहे.

राज्यसभा निवडणुकीत मुख्यमंत्री मतदान का करणार नाहीत?

दुसरीकडे राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे आमदार उमेदवाराला जिंकवण्यासाठी मतदान करतात. महाराष्ट्रात एकूण 288 आमदारांचे संख्याबळ आहे. तर विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या 78 आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी केवळ विधानसभा आमदारांनाच मतदान करण्याची मुभा आहे. विधान परिषद आमदारांना मतदानाचा अधिकार नसतो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधानसभेचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर निवडून गेलेत, त्यामुळे त्यांना या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाही.


हेही वाचाः मलिकांना मतदानासाठी तूर्त परवानगी नाहीच; फेरविचारासाठी पुन्हा याचिका करणार