अहमदनगर – रविवारी ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघामध्ये क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा सहा गडी राखून पराभव करत विजय मिळवला. अंतिम सामन्यापूर्वीचे सर्व सामने भारताने जिंकले, त्यामुळे आता वर्ल्डकपच्या ट्रॉफीवरही भारतच नाव कोरणार असं सगळ्यांनाच वाटत होतं. मात्र अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. भारताच्या या पराभवामुळे खेळांडूसोबतच क्रिकेट चाहते प्रचंड निराश झाले. पराभवानंतर भारतीय खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू होते. हे पाहून अनेक भारतीयांनाही अश्रू अनावर झाले. असाच प्रसंग राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या घरात घडला. त्यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्यांची मुलगी ओक्साबोक्सी रडताना दिसत आहे. टीम इंडियाच्या पराभवानंतर प्राजक्त तनपुरे यांची मुलगी आरोहीला अश्रू अनावर झाले. भारताने फक्त दोनच वर्ल्डकप जिंकले आहेत असं म्हणत ती रडायला लागली. आजी तिला समाजवून सांगत होती, की तो खेळ आहे. ऑस्ट्रेलियाच्या बाजूने विचार कर. पण आरोही ही टीम इंडियाची जबरदस्त चाहती असल्याने तिला भारतीय संघाचा पराभव जिव्हारी लागल्याच्य व्हिडिओमध्ये जाणवत आहे.
आजच्या पराभवाने कोट्यावधी भारतीयांची मने दुखावली. माझी कन्या आरोही त्याला अपवाद नव्हती. आरोहीने आजच्या मॅचसाठी आणि भारताच्या विश्वविजेतेपदासाठी खूप तयारी केली होती. पण शेवटी खेळात आणि आयुष्यात हार-जीत चालू असते. पराभव पचवून पुन्हा उभारी घ्यायची असते.
भारतीय टीम पूर्ण स्पर्धेत… pic.twitter.com/KaHd33oU4D— Prajakt Prasadrao Tanpure (@prajaktdada) November 19, 2023
आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लिहिले आहे, “आजच्या पराभवाने कोट्यावधी भारतीयांची मने दुखावली. माझी कन्या आरोही त्याला अपवाद नव्हती. आरोहीने आजच्या मॅचसाठी आणि भारताच्या विश्वविजेतेपदासाठी खूप तयारी केली होती. पण शेवटी खेळात आणि आयुष्यात हार-जीत चालू असते. पराभव पचवून पुन्हा उभारी घ्यायची असते. भारतीय टीम पूर्ण स्पर्धेत खूप चांगली खेळली. पण आजचा दिवस आपला नव्हता. आस्ट्रेलिया टीमचे अभिनंदन!”