आपण पवार कुटुंबाची चिंता करू नये, रोहित पवारांचे ट्विट करत दरेकरांना प्रत्युतर

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आधी पवार कुटुंबातील मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण ते जाहीर करावे असे आव्हान प्रवीण दरेकर यांनी दिले होते. दरेकर म्हणाले की, रोहित पवार अजून लहान आहेत. तसेच हयात नसलेल्या व्यक्तींचा वापर करुन वाद निर्माण करणं महत्त्वाचे नाही.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( Opposition Leader Praveen Darekar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) आमदार रोहित पवार ( Rohit Pawar) यांच्यातील आरोप- प्रत्यारोप चांगलेच रंगले आहेत. भाजपाचे (bjp) दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्याबाबत रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरुन दरेकर यांनी टिका (criticized) केली होती. या टिकेला रोहित यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दरेकर साहेब आपण पवार कुटुंबाची चिंता करू नये,  असा सल्ला रोहित यांनी दरेकर यांना दिला आहे.

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री

रोहित पवार यांनी एका कार्यक्रमादरम्यान दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्याबाबत वक्तव्य केले होते. राज्यात २०१४ मध्ये जनतेच्या मनातील मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते.  परंतु तसे घडले नाही. आज आपल्यासोबत ते नाहीत. जर ते असते तर राजकारणाची पातळी खालच्या स्तरावर गेली नसती. राजकारणात विरोध झाला असता, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत वाद झाला असता परंतु संस्कृती आणि पातळी सोडून कोणी बोलले नसते. आज ते नसले तरी आमच्या आणि तुमच्या मनात, विचारात आहेत. त्यांचा विचार घेऊन आपण काम केले पाहिजे. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नगरविकास मंत्री धनंजय मुंडे काम करत आहेत असे रोहित पवार म्हणाले होते.

रोहित अजून लहान आहेत

रोहित यांच्या या वक्तव्याचा समाचार प्रवीण दरेकर यांनी घेतला. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आधी पवार कुटुंबातील मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण ते जाहीर करावे असे आव्हान प्रवीण दरेकर यांनी दिले होते. दरेकर म्हणाले की, रोहित पवार अजून लहान आहेत. तसेच हयात नसलेल्या व्यक्तींचा वापर करुन वाद निर्माण करणं महत्त्वाचे नाही. पवार कुटुंबातील मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार कोण याबाबत रोहित पवारांनी जाहीर करावे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या मनात कुठल्या कोपऱ्यात मुख्यमंत्रीपदाची ओढ आहे. याबाबत त्यांनी सांगावे. कुटुंबातील उमेदवाराचे नाव निश्चित करा आणि मग हयात नसलेल्या गोपीनाथ मुंडेंबाबत वक्तव्य करा.

आपणास मुंडे साहेब समजले नसावेत

दरेकर यांच्या या टिकेवर रोहित यांनी ट्टिट करत प्रत्युत्तर दिले आहे. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास तीन ट्विट ( twit) करत रोहित म्हणाले की, काही राजकीय नेत्यांचं कर्तृत्व राजकारणाच्या पलिकडं असतं तसंच कर्तृत्व मुंडे साहेबांचं असल्याने ते लोकनेते होते. त्यांनी अनेक कार्यकर्ते आणि नेते घडवले. म्हणून सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्ते त्यांच्याकडं मुख्यमंत्री म्हणूनच बघायचे. त्यामुळं मुंडे साहेबांविषयी मी व्यक्त केलेल्या भावनांचं दरेकर आपण स्वागत करायला हवं होतं. परंतु तसं न करता उलट आपण माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यावरच टीका केली हे आश्चर्यकारक आहे. कदाचित मुंडे साहेबांच्या निधनानंतर आपण भाजपामध्ये आल्याने आपणास मुंडे साहेब समजले नसावेत. आणि हो… पवार कुटुंब म्हणून आम्ही एकत्रितपणे राजकीय दिशा ठरवत असतो आणि आमचं ठरलंय. त्यामुळं दरेकर आपण पवार कुटुंबाची चिंता करू नये! उलट राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल हे आपण मान्य केलं, याबद्दल आपले आभार!, असे रोहित पवार म्हणाले.