मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्यात आज राज्यमंत्रिमंडळाची बैठ पार पडत आहे. या बैठकीत मराठवाड्यातील पाणीप्रश्न आणि पायाभूत सुविधांबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी मराठवाड्यातील या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीच्या सरकारला एक विनंती केली आहे. (NCP MLA Rohit Pawar Slams Maharashtra Government CM Eknath Shinde)
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारला विनंती केली आहे. “छत्रपती संभाजीनगरला होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही खऱ्या अर्थाने मराठवाड्यातील जनतेला न्याय देणारी व्हावी.. आजची परिस्थिती बघता राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची नितांत गरज आहे. कारण पाऊस नसल्याने खरीप तर हाताचा गेलाच पण आता पिण्याचं पाणी आणि जनावरांना चारा या समस्येला तोंड द्यावं लागणार आहे, शिवाय सामान्य कुटुंबातील मुलांना शाळेची फी भरणही कठीण आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्याच्या हितासाठी स्वतःच्या ट्रिपल इंजिनला दिल्लीच्या जंबो इंजिनाची जोड देऊन दुष्काळामुळं निर्माण झालेले प्रश्न सोडवावेत, ही विनंती!”, असे ट्वीट रोहित पवारांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगरला होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही खऱ्या अर्थाने मराठवाड्यातील जनतेला न्याय देणारी व्हावी.. आजची परिस्थिती बघता राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची नितांत गरज आहे…
कारण पाऊस नसल्याने खरीप तर हाताचा गेलाच पण आता पिण्याचं पाणी आणि जनावरांना चारा या समस्येला तोंड… — Rohit Pawar (@RRPSpeaks) September 16, 2023
दरम्यान, सात वर्षांपूर्वी झालेल्या बैठकीत 50 हजार कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली होती. आता आज होणाऱ्या बैठकीत मराठवाड्यासाठी तब्बल 40 हजार कोटींहून अधिक रकमेचे प्रस्ताव मान्यतेसाठी मांडले जाणार असल्याचे समजते. मराठवाड्यातील अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे विविध जलसिंचन प्रकल्पांसाठी 21 हजार कोटींची तरतूद आहे. या बैठकीत कृषी विभागासाठीही 600 कोटींचे प्रस्ताव येणार असल्याचे समजते.
मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाचे सावट आहे. जालना येथील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आंदोलन सुरू होते. उपोषण संपले असले तरी त्याठिकाणी झालेल्या लाठीमारामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.
हेही वाचा – …यासाठी सरकारने वेळ मारून नेली, जरांगेंच्या उपोषणावरून ठाकरे गटाचा शासनावर निशाणा