इतिहासाचा चुथडा करणार आणि दोष राष्ट्रवादीला देणार का? जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना सवाल

तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून इतिहासाचा चुथडा करणार आणि दोष राष्ट्रवादी काँग्रेसला देणार का? मी भटक्या समाजाचा मागासवर्गीय माणूस आहे. मग कसला जातीवाद? असे सवाल उपस्थित करत राष्ट्रावादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.

jitendra awhad

तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून इतिहासाचा चुथडा करणार आणि दोष राष्ट्रवादी काँग्रेसला देणार का? मी भटक्या समाजाचा मागासवर्गीय माणूस आहे. मग कसला जातीवाद? असे सवाल उपस्थित करत राष्ट्रावादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. राज ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. जातीवादी राजकारण राष्ट्रवादीच्या जन्मापासून झाले आहे. तसेच, शरद पवारांनी कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही, अशा शब्दांत पवारांवर राज ठाकरेंनी टीका केली. त्यांच्या या टीकेला आव्हाडांनी प्रत्युत्तर दिले आहे. (ncp mp jitendra awhad slam raj thackeray)

”राष्ट्रवादीचा जन्म १९९९ ला झाला. त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांची प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांच्या इतिहासावर ‘हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ हे जेम्स लेनने लिहिलेले पहिले घाणेरडे पुस्तक आले. त्या पुस्तकामध्ये माँसाहेब यांच्या चारित्र्याबद्दल आणि शहाजीराजांच्या पितृत्वाबद्दल शंका घेण्यात आली होती. या पुस्तकाच्या प्रस्ताविकामध्ये अनेकांची नावे होती. हे या पुस्तकात कसे आले? या पुस्तकाबद्दल सगळ्यात पहिले आक्षेप घेणारा मी आणि सीपीआयचा कार्यकर्ता किशोर ढमाले हेच होतो. नंतर तो मुद्दा सगळ्या मोठ्या नेत्यांनी उचलला. परंतु महाराष्ट्राचे माता पिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातेबद्दल त्यांच्या पित्याबद्दल शंका घेणाऱ्या जेम्स लेनला आम्ही माफ करणार का? त्याला माहिती पुरवणाऱ्यांना माफ करावं अशी इच्छा आहे का? ते आमच्याकडून नाही होणार, तुम्ही काहीही म्हणा” अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.

जे ६ डिसेंबरला आपल्या घरातच थांबत नाही, त्यांनी आम्हाला जातीपाती शिकवू नयेत. तुम्ही ६ डिसेंबरच्या आधी आणि ६ डिसेंबरच्या नंतर कुठे असतात ते एकदा जाहीररीत्या सांगा ना.. तेव्हा उगाच राष्ट्रवादीवर आणि शरद पवारांवर नको ते आरोप करू नका. आम्ही पूर्ण पुराव्यानिशी उत्तर देतो, असे देखील आव्हाड यांनी म्हटले. ‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहास खोटा दाखवला. महाराजांच्या इतिहासाचं तेव्हा विकृतीकरण कोण करतं? वर्ण वर्चस्ववाद कोण करतं? जातीय द्वेष कोण पसरवतं? असे सवाल उपस्थित करत जितेंद्र आव्हाडांनी ठाकरेंनप टीका केली.

पुढे आव्हाड म्हणाले की, “शाहू फुले आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांना देवत्व देऊ नका. ती असामान्य माणसं होती. त्यांचे कर्तृत्व असामान्य होतं. त्यांचे विचार असामान्य होते. ज्या समाजात ज्या प्रतिकूल समाजामध्ये ते जन्माला आले, तिथली सगळी परिस्थिती बदलून टाकण्याचं काम महापुरुषांनी केले म्हणून माझ्यासारखे भटक्या जमातीतील मागासवर्गीय मुलगा आज तुमच्यासमोर बसलाय आणि बोलत आहे”

“मी पाहिजे त्या विषयावर बोलू शकतो. ही सगळी शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचीच विचारसरणी आहे आणि ती महाराष्ट्राला ती कळली पाहिजे. अजूनही लोकांना वाटतं की बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळे शिवाजी महाराज लोकांच्या घरोघरी कसे पोहोचले. पण महाराष्ट्र वेडा नाहीये. या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला जन्मताच शिवाजी महाराज समजतो”, असं आव्हाड म्हणाले.


हेही वाचा – भारताप्रमाणे पाकिस्तानलाही हवं होतं स्वस्तात तेल; पण रशियाने दिला झटका