राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यास नवस फेडेन…

सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने नव्या चर्चांना उधाण

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विरोधकांची यथेच्छ टीका सहन करीत आणि अल्टिमेटमचे सारे अडथळे पार करीत सत्तापदावरील अर्धा कार्यकाळ अर्थात अडीच वर्षे नुकतीच पूर्ण केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार असे म्हटले जाते. त्यांच्याच प्रयत्नांतून राष्ट्रवादीच नव्हे, तर विरोधी विचारांची काँग्रेसदेखील शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसली आहे.

असे असूनही मुख्यमंत्रिपद हाती न आल्याची खंत राष्ट्रवादीच्या नेत्यांना कधी ना कधी वाटत असतेच. त्याचाच प्रत्यय अनावधानाने की जाणीवपूर्वक का होईना राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या तोंडून बाहेर आला. सुप्रिया सुळे यांनी नुकताच मराठवाड्याचा दौरा केला. या दौर्‍याचा शेवट त्यांनी रविवारी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचे दर्शन घेऊन केला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे, सगळा पक्ष घेऊन दर्शनाला येईन, असा नवस देवीकडे केल्याचे सांगताच सर्वांच्या भुवया उंचावल्या.

राज्यात अजूनपर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झालेला नाही. राज्यात दिवसेंदिवस राष्ट्रवादीची ताकद वाढत आहे. पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. अंबाबाईच्या आशीर्वादाने राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यास संपूर्ण पक्ष घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईन, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सोबतच महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार, असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला असता मी याबद्दल सांगू शकत नाही. मी काही ज्योतिष सांगणारी नाही. मुख्यमंत्री व्हावे की नाही याबाबत मी कधी विचार केलेला नाही. हे सगळे महाराष्ट्रातील लोक ठरवतील, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच राज्यात चांगला पाऊस पडू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे, असे साकडे तुळजाभवानीकडे घातल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

मविआच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात भाजपकडून सर्वाधिक टीका झाली असेल ती उद्धव ठाकरे अन् त्यांच्याकडील मुख्यमंत्रिपदावरच. खासकरून कोरोना संकटाच्या काळात शरद पवार राज्याचा दौरा करीत असताना उद्धव ठाकरे कसे घरातच बसून होते याचे असंख्य दाखले देत भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला होता. एवढेच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार अतिशय कार्यक्षमपणे सरकार सांभाळत असून त्यांच्याच हाती राज्याचा कारभार हवा होता, अशी खोचक टीकाही अधूनमधून होत असते.

विशेषकरून मागील वर्षभराच्या काळात अर्थ खात्याची चावी हाती असलेल्या अजित पवार यांच्याकडून शिवसेना आमदारांना पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जात नाही. निधी वाटपावर राष्ट्रवादीचेच वर्चस्व असून राष्ट्रवादीचे नेते सातत्याने शिवसेना नेत्यांची कोंडी करीत असल्याची तक्रार शिवसेनेच्या लहान-मोठ्या सर्वच नेत्यांकडून होऊ लागली आहे. ही वाढती धुसफूस राष्ट्रवादीसाठी पोषक ठरणारी असून पुढच्या अडीच वर्षांच्या काळात राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्रिपदाचा हट्ट तर केला जाणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो. तसे झाल्यास याचसाठी केला होता अट्टाहास, असे शिवसेना पक्षप्रमुखांना न वाटले तरच नवल.