जे विलासराव देशमुखांनी केले ते फडणवीसांना का जमले नाही?

nawab malik
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

राज्यात कोल्हापुर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग हे जिल्हे मोठ्याप्रमाणावर पुराचा सामना करत आहेत. २६ जुलैला पूरपरिस्थिती आली होती, तेव्हा विलासराव देशमुख यांनी सर्वपक्षीय बैठक तात्काळ बोलावून यंत्रणा सक्षम केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी सत्तेचा माज सोडला पाहिजे, असे नवाब मलिक म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सर्वपक्षीय बैठक घेण्याची गरज आहे. राज्यातील १० जिल्हयात पूरग्रस्त परिस्थिती असताना मुख्यमंत्री प्रचारात मग्न होते, हे बेजबाबदारपणाचे लक्षण असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. आपत्कालीन व्यवस्थेचा विचार करताना नौदल वायुदलाची बैठक लावण्याची गरज आहे, अशी विरोधकांची मागणी असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत भाजप सरकार आणि त्यांच्या भोंगळ कारभारावर हल्लाबोल केला. राज्यात पुरपरिस्थिती असताना मुख्यमंत्री मुंबईत येऊन कॅबिनेट बैठकीत जमीन वाटपाची चर्चा करतात. मात्र त्यांना राज्यात आलेल्या संकटाची चिंता नाही असेही नवाब मलिक म्हणाले. मुख्यमंत्री आपल्या पक्षाच्या प्रचारात व्यस्त आहेत. कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना केवळ फोनवरून संपर्कात असल्याचे सांगितले जाते ही दुर्दैवी बाब आहे.

मागील दहा दिवसापासून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कित्येक ठिकाणी अन्नाचा तुटवडा निर्माण झालाय. विरोधक आपली जबाबदारी बजावत आहेत. आमचे आमदार, खासदार आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्तासाठी देणार असल्याची महत्वपुर्ण घोषणा नवाब मलिक यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उद्या औषधे, बिस्कीटं अशा प्रकारच्या मदतीसाठी राषट्रवादी काँग्रेस वेलफेअर ट्रस्टच्यावतीने एक ट्रक क्रांती मैदानातून रवाना होईल अशी माहितीही नवाब मलिक यांनी दिली. इस्लामपुर येथे ७२ हजार पूरग्रस्तांना राहण्याचीही व्यवस्था पक्षाच्यावतीने करण्यात आल्याचे नवाब मलिक म्हणाले.