घरमहाराष्ट्रऔरंगाबाद नामांतराला आता राष्ट्रवादीचाही विरोध

औरंगाबाद नामांतराला आता राष्ट्रवादीचाही विरोध

Subscribe

औरंगाबादच्या नामांतरणाला महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता विरोध केला आहे. औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण हा महाविकास आघाडी सरकारच्या अजेंडावरील विषय नाही. त्यामुळे प्रश्नच येत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

औरंगाबाद महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजण्याआधीच शहरातील राजकारण प्रचंड तापायला लागले आहे. औरंगाबाद शहराचे संभाजीनगर, असे नामकरण करण्यात यावे, अशी भूमिका शिवसेनेची आहे. मात्र, या नामकरणाला सत्ताधारी पक्षातील काँग्रेसचा विरोध आहे. औरंगाबाद शहरातील शिवसेनेचे दिग्गज नेते चंद्रकांत खैरे यांनी नामकरणावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे.

- Advertisement -

तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा नामकरणाला विरोध आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराच्या नामकरणावर मंत्रिमंडळातील नेत्यांचे एकमत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नामकरणाबाबत आतापर्यंत फक्त शिवसेना आणि काँग्रेसची भूमिका समोर आली होती. मात्र, आता राष्ट्रवादीचीदेखील भूमिका समोर आली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद शहराच्या नामकरणावर प्रतिक्रिया दिली होती. नाव बदल हा आमचा कार्यक्रम नाही. नाव बदल आणि अशा प्रकारच्या गोष्टींना आमचा विरोध राहील, असे थोरात म्हणाले होते. तशीच भूमिका आता नवाब मलिक यांनी मांडली आहे.

- Advertisement -

सत्ता आल्यास पहिल्याच दिवशी नामांतरण -पाटील
औरंगाबाद महापालिकेवर भाजपची सत्ता आल्यावर आम्ही पहिल्याच दिवशी औरंगाबादचे नाव बदलून घेतो, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. म्हणूनच आम्ही नामकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहोत असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले. याआधी विलासराव देशमुख यांच्या काळात हा प्रस्ताव सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र देऊन मागे घेण्यात आला होता. पण आता नव्याने प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया करावी लागेल. औरंगाबाद महापालिकेत हा प्रस्ताव मंजुर झाला की राज्य सरकारसमोर येईल. त्यानंतर केंद्रात नगर विकास विभागाकडे हा प्रस्ताव मंजुर करून घ्यावा लागेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -