घरताज्या घडामोडीअखेर प्रकाश सोळंकेंची नाराजी मिटवण्यात शरद पवार यशस्वी!

अखेर प्रकाश सोळंकेंची नाराजी मिटवण्यात शरद पवार यशस्वी!

Subscribe

प्रकाश सोळंके यांची नाराजी दूर करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना यश आलं असून राजीनामा मागे घेत असल्याचं प्रकाश सोळंकेंनी जाहीर केलं आहे.

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अपेक्षित मान ठेवला गेला नाही, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडच्या माजलगावमधले आमदार प्रकाश सोळंके नाराज असल्याचं समोर आलं होतं. त्यावर त्यांनी स्वत: प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘राजकारणाची किळस आली आहे, त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देत आहे’, अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र, पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या डावपेचांना यश आलं असून प्रकाश सोळंकेंची नाराजी दूर करून त्यांना राजीनामा मागे घेण्यास भाग पाडण्यात शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची इतर नेतेमंडळी यशस्वी झाली आहेत. स्वत: जयंत पाटील, प्रकाश सोळंके, अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर येऊन ‘नाराजी दूर झाली असून या मुद्द्यावर आता पडदा पडला आहे’, असं स्पष्ट केलं आहे.

पाटील, मुंडे, अजितदादांनी केली सोळंकेंची मनधरणी!

आज सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसकडून खुद्द अजित पवार, जयंत पाटील आणि धनंजय मुंडे हे प्रकाश सोळंकेंच्या संपर्कात होते. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचं या नेत्यांकडून सांगण्यात येत होतं. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. दुपारी या सर्व नेत्यांसोबत प्रकाश सोळंकेंची दोन ते अडीच तास चर्चा झाली. या चर्चेनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर येऊन सोळंकेंची नाराजी दूर झाल्याचं जाहीर केलं. ‘प्रकाश सोळंके यंच्यासोबत चर्चा झाली. प्रसारमाध्यमातून त्यांच्या नाराजीची चर्चा समोर आली होती. पण त्यांच्याशी आज मुंबईत चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक मोठं कुटुंब आहे. प्रत्येकाला योग्य ती जबाबदारी देणं ही पवार साहेबांची पद्धत राहिली आहे. त्यावर आमच्या झालेल्या चर्चेतून प्रकाश सोळंके यांची नाराजी दूर झाली आहे’, असं जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

‘पक्षाने न्याय द्यावा अशी भूमिका होती’

दरम्यान, यावेळी आपल्या नाराजीविषयी खुद्द प्रकाश सोळंकेंनी पत्रकारांसमोर खुलासा केला. ‘मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. माझी ही चौथी टर्म आहे. त्यामुळे पक्षाने मला न्याय द्यावा, अशी माझी भूमिका होती. त्यातून नाराजी झाली होती. दोन दिवसांत राजकीय परिस्थितीचा विचार करून मी निष्कर्षावर आलो होतो की राजीनामा द्यायचा. पण गेल्या २ दिवसांत माझ्या मतदारसंघातले कार्यकर्ते मला राजीनामा न देण्याविषयी सांगत होते. शिवाय, आज दोन तास आमची चर्चा झाली. पवार साहेबांशी देखील माझं फोनवर बोलणं झालं आहे. त्यानंतर मी राजीनामा मागे घेत आहे’, असं सोळंके म्हणाले.

मंत्रिमंडळ विस्तारावेळी प्रत्येकाला आपल्याला संधी मिळावी असं वाटत असतं. राष्ट्रवादी काँग्रेस कुटुंब म्हणून काम करतं. पवार साहेब देखील त्याच पद्धतीने काम करतात. त्या पार्श्वभूमीवर या वर्षाचा आज शेवट चांगला झाला आहे.

अजित पवार, उपमुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -