घरठाणेराज ठाकरेंचा इशारा गांभीर्याने घ्या!

राज ठाकरेंचा इशारा गांभीर्याने घ्या!

Subscribe

रमजान ईदनंतर म्हणजे ३ मेनंतर मशिदींवरचे भोंगे उतरविण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेला इशारा गांभीर्याने घेण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी आघाडी सरकारला केली. राज्यातील सामाजिक ऐक्याला धक्का लावण्याचा प्रयत्न होत आहे.

रमजान ईदनंतर म्हणजे ३ मेनंतर मशिदींवरचे भोंगे उतरविण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेला इशारा गांभीर्याने घेण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी आघाडी सरकारला केली. राज्यातील सामाजिक ऐक्याला धक्का लावण्याचा प्रयत्न होत आहे. सांप्रदायिक विचारांची मांडणी काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत. लोकांनी याला बळी पडू नये, असे आवाहनही पवार यांनी केले.

राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्याच्या सभेत बोलताना शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे यांचा प्रत्येक मुद्दा खोडून काढताना पवार यांनी राज यांना अप्रत्यक्षरीत्या काही सल्लेही दिले.

- Advertisement -

मला नास्तिक म्हणता, परंतु मी तुमच्यासारखे देवधर्माचे प्रदर्शन कुठे मांडत नाही. मी १३-१४ वेळा निवडणुकीचा नारळ कुठे फोडतो ते बारामतीकरांना जाऊन विचारा. ते एकच ठिकाण आहे आणि एकच मंदिर आहे. त्याचा आम्ही गाजावाजा करत नाही. माझ्यापुढे प्रबोधनकार ठाकरेंचा आदर्श आहे. प्रबोधनकारांनी देवधर्माच्या नावाने बाजार मांडणार्‍या प्रवृत्तींवर सडकून टीका केली आणि गैरफायदा घेणार्‍याला ठोकून काढण्याचे काम केले. आम्ही सगळे प्रबोधनकार वाचतो, मात्र कुटुंबातील लोक ते वाचत नसावेत, असा टोला पवार यांनी राज ठाकरे यांना लगावला. एखादी व्यक्ती वर्ष – सहा महिन्यांतून एखादे वक्तव्य करत असेल तर ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही, पण पत्रकार विचारत आहेत म्हणून त्यावर मत व्यक्त करतोय, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे मी नाव घेत नाही, असा उल्लेख राज ठाकरे यांनी केला, पण दोनच दिवसांपूर्वी मी अमरावतीत होतो. त्या ठिकाणचे माझे संपूर्ण भाषण ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानावर जवळपास मी २५ मिनिटे बोललो. अर्थात मला रोज सकाळी लवकर उठून वृत्तपत्र वाचनाची सवय आहे. त्यासाठी मला लवकर उठावे लागते. खूपदा वृत्तपत्रात काय काय लिहिलंय हे न वाचता एखादा वक्तव्य करत असेल तर त्याला दोष देणार नाही, असे शरद पवार यांनी राज ठाकरे यांना सुनावले.

- Advertisement -

मी फुले-शाहू-आंबेडकरांचा उल्लेख करतो त्याचा मला अभिमान आहे, असे सांगतानाच दुसरी गोष्ट त्यांना माहिती असली पाहिजे की, या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिले काव्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी रचले होते. या तिघांचा उल्लेख करणे म्हणजे शिवछत्रपतींच्या विचारांची मांडणी करण्यासारखे आहे, असेही शरद पवार म्हणाले. आज खर्‍या अर्थाने महागाई, दरवाढ, बेरोजगारी हे जिव्हाळ्याचे प्रश्न होते. ज्यांनी एवढे मोठे भाषण केले, त्यांनी सामान्य जनतेच्या सुखदुःखाच्या प्रश्नांचा साधा उल्लेखही केला नाही, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.

पुरंदरेंनी शिवचरित्र वेगळीकडे वळविले
बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल मी बोललो हे मी लपवून ठेवत नाही. पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा उल्लेख करत असताना माँ जिजाऊंनी छत्रपतींचे व्यक्तिमत्त्व घडवले, असे सांगण्याऐवजी दादोजी कोंडदेव यांनी ते घडविले असा उल्लेख केला होता. त्याला माझा सक्त विरोध होता. शिवछत्रपतींना घडविण्यामध्ये जिजाऊंचाच हात होता, परंतु पुरंदरेंनी ते वेगळीकडे नेण्याचा प्रयत्न केला. तो योग्य नव्हता असे माझे मत तेव्हाही होते आणि आजही कायम आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले.

जेम्स लेनने जे काही लिखाण केले त्या लिखाणाचा आधार त्यांनी पुरंदरेंकडून घेतला होता, अशी माहिती जेम्स लेनने दिली होती. एखादा लेखक जर असे वक्तव्य करत असेल तर त्यावर पुरंदरे यांनी कधी खुलासा केला नाही, म्हणून मी जी टीका टिप्पणी केली असेल तर त्याचे मला दु:ख वाटत नाही. उलट मला अभिमान वाटतो, असे पवार म्हणाले.

सोनिया गांधींच्या पंतप्रधानपदाला आमचा आक्षेप होता
सोनिया गांधी आणि माझ्याबद्दल राज ठाकरे यांनी वक्तव्य केले. याबाबतीत माझे जाहीर मत आधीपासूनच स्पष्ट होते. सोनिया गांधी यांनी जेव्हा मी पंतप्रधानपदावर जाऊ इच्छित नाही, असे जाहीर वक्तव्य केल्यानंतर तो प्रश्न तिथेच संपला होता. आमची चर्चा त्यांच्या पंतप्रधानपदाबाबत होती. तो विषय निकाली लागल्यानंतर त्यावर चर्चा करण्याचे कारण नव्हते. त्यामुळे काँग्रेससोबत आम्ही तेव्हा गेलो आणि आजही त्यांच्यासोबत आहोत, मात्र त्या काळात जे काही घडले, त्याचे सविस्तर वाचन केले असते तर कदाचित अशा प्रकारचे उद्गार राज ठाकरे यांनी काढले नसते, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

आमचा संपणारा पक्ष नसून संपवणारा पक्ष आहे, असे राज ठाकरे म्हणतात ते खरे आहे. संपवणारा पक्ष याची नोंद महाराष्ट्रातील मतदारांनी योग्य घेतली. त्यांचा एकच आमदार निवडून आलेला आहे. त्यांच्या सभा मोठ्या होतात, सभेला लोक जातात. त्या सभेत शिवराळ भाषा आणि नकलांतून लोकांची करमणूक होते, असा सणसणीत टोला शरद पवार यांनी लगावला.

अजित पवार वेगळे नाहीत
अजित पवार यांच्यावर ईडीची कारवाई होते आणि सुप्रिया सुळे यांच्यावर होत नाही, हा आरोप पोरकट आहे. अजित पवार आणि मी वेगळा नाही. आमचे कुटुंब एकच आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.

विक्रांतसाठी पैसे गोळा केले हे दिसत आहे. पैसे गोळा केले तर त्याचा विनियोग काय केला? माझ्या वाचनात आले की ते पक्षाकडे जमा केले. भावनेला हात घालून पैसे गोळा केले. मग तो एक रुपया असो किंवा ११ हजार रुपये ते पक्षाकडे का दिले. ते पैसे सैन्यदल किंवा नौदलला देता आले असते. माझ्या मते हे आक्षेपार्ह आहे, असे मतही शरद पवार यांनी व्यक्त केले.

भाषणात भाजपबद्दल एकही शब्द नाही
राज यांच्या भाषणात भाजपबद्दल एकही शब्द आलेला नाही. त्यांच्यावर भाजपने कदाचित काही जबाबदारी दिलेली असावी, त्याचा प्रत्यय कालच्या सभेत आला. महागाई, बेरोजगारी एवढी वाढलेली असताना जर एखादा राजकीय नेता आपल्या सभेत एक शब्द बोलत नाही, म्हणजे काय समजायचे , असा सवाल शरद पवार यांनी केला.

वारसा प्रबोधनकारांचा, विचारसरणी गोडसेची – जयंत पाटील
वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. २०१४ ला मोदींना पाठिंबा… २०१९ ला मोदींना विरोध आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर घेतली. पुतण्या बाळासाहेब ठाकरेंचा परंतु नाते मात्र बाळासाहेबांचा विचार संपवणार्‍या लोकांशी… वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत, असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

तलवार काढून उंचावणे भोवले, राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल

शहरात मंगळवारी आयोजित केलेल्या सभेत तलवार उंचावल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश भोसले, शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह 7 ते 8 मनसैनिकांवर बुधवारी ठाणे शहरातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे शहरातील डॉ. मुस रोडवर मंगळवारी आयोजित केलेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत करताना तलवार भेट देण्यात आली होती. ही तलवार राज ठाकरे यांनी म्यानातून बाहेर काढत काही क्षणासाठी उंचावली होती. याप्रकरणी बुधवारी नौपाडा पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्यासह जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह 7 ते 8 जणांविरोधात भा.दं.वि कायदा कलम ३४सह भारतीय हत्यार कायदा १९५९चे कलम ४ व २५प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -